मुंबई- खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे गटाची शिवसेना असल्याचा निकालविधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. त्यावर शिंदे गटासह ठाकरे गटातील नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ठाकरे गटातील नेत्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर जोरदार टीका केली.
शिवसेना आमदार अपात्रतेबाबतचे प्रकरण न्यायालयात 9 महिने चाललं. 2023 मे मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांना दिले. त्यावर निर्णय लावण्यासाठीदेखील विधानसभा अध्यक्षांनी सात महिने लावले. विधानसभा अध्यक्षांनी खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच अशा प्रकारचा निकाल दिला. शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांची प्रतोद मान्यता दिली तर सुनील प्रभू यांचे प्रतोदपद अमान्य केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे दोन्ही गटातील एकाही आमदाराला अपात्र केलेलं नाही.
ही दडपशाही आणि झुंडशाही-निकालावर प्रतिक्रिया देताना शिवसेना (ठाकरे गट) नेते तथा आमदार भास्कर जाधव म्हणाले, "विधानसभा अध्यक्षांचा हा निर्णय पूर्णपणे अनाकलनीय आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे मुख्यमंत्र्यांचं तोंड गोड करायला गेले होते. सुप्रीम कोर्टामुळे त्यांना आम्हाला अपात्र करता आलं नाही. लोकशाही राहिलेली नाही. ही दडपशाही आणि झुंडशाही सुरू आहे. याविरोधात लढावं लागेल. लोकशाही वाचविण्यासाठी देशातील जनतेनेच उभं राहिलं पाहिजे".
निकाल स्क्रिप्टेड-शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी सव्वा तासाच्या निकाल वाचनानंतर शिंदे गट खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. त्यावर महाविकास आघाडीतील नेत्यांनीही टीका केली आहे. विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल स्क्रिप्टेड असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्ष विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. महाशक्तीच्या आदेशानं आलेला हा निकाल असल्याचं विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी म्हटलं.
लोकशाही धोक्यात येईल-पुढे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार म्हणाले की, " महाशक्तिचा पूर्ण आशीर्वाद असल्यामुळे हे होणं अपेक्षित आहे. ठाकरे आणि शिवसेना दूर जाऊ शकत नाही. जनतेच्या मनात तेच आहे. हा अंतिम निकाल नाही. विधानसभा अध्यक्षांनी निकाल देताना दोन्ही लोकांना पात्र ठरविले. कारण त्यांना जनतेत रोष ओढवून घायचा नव्हता. अपात्र केले असते तर जनतेचा उद्रेक झाला असता. त्यामुळे बाजू सावरायची होती. संविधानविरोधी निकाल आहे. यामुळे लोकशाही धोक्यात येईल. स्वातंत्र्यानंतर अशा घटना घडणं हे घातक आहे"
आम्ही सगळे ठाकरे यांच्यासोबत-आता मविआमध्ये शिवसेनेचे स्थान काय? यावर वडेट्टीवार म्हणाले की, "उद्धव ठाकरे आमच्या सोबत असणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे हीच शिवसेना आहे. हा निर्णय मराठीत व्हायला हवा होता. शिवसेना म्हणजे मराठी भाषा, ठाकरे आणि मराठी अस्मिता जपणारा पक्ष आहे. मात्र निकाल इंग्रजीत येतो म्हणजे महाशक्तिचं किती मोठं दडपण आहे, हे दिसत आहे. काँग्रेस, शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत".
निकाल दिल्लीतील गुजराती लॉबीने लिहिला-शिवसेना पक्षातील आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेला निर्णय हा देशासह महाराष्ट्राच्या राजकारणातील काळा दिवस असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनाही निकालात डावल्याचे दिसत आहे. घटनेतील 10 शेड्यूल डावलल्यामुळे संविधानाची पायमल्ली झाल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला. राहुल नार्वेकर यांचा निकाल दिल्लीतील गुजराती लॉबीने लिहून दिला. हा निकाल म्हणजे महाराष्ट्रातील लोकशाही परंपरेला काळीमा फासणारा आहे. सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाला योग्य न्याय मिळेल", असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
"लोकशाही आणि संविधान अबाधित राहावे अशा प्रकारची भूमिका काँग्रेसची आहे. भारतीय जनता पक्ष देशातील विरोधी पक्ष संपवायच्या मागे लागलेला आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे-काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
जनता त्यांना धडा शिकवेल-मविआवर कोणताही परिणाम नाही- विधानसभा अध्यक्षांच्या निकालानं महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. पटोले म्हणाले," उलट महाविकास आघाडी अधिकच मजबूत होणार आहे. भारतीय जनता पार्टीचा डाव लक्षात आला असून जनता त्यांना धडा शिकवेल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यामुळे संगनमताने झालं काय अशी शंका उपस्थित होत आहे.
हा निकाल म्हणजे लोकशाहीची हत्या-विधानसभा अध्यक्षानी निकाल देताना ठाकरे गट आणि शिंदे गटातील कोणत्याच आमदारांना अपात्र केले नाही. मात्र सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिले होते, त्याचे पालन विधानसभा अध्यक्षांनी केले नाही, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर बुधवारी पत्रकार परिषदेत केली. हा निकाल म्हणजे लोकशाहीची हत्या आहे. पक्षांतराचा राजमार्ग कसा असायला हवा हे त्यांनी दाखवलं आहे. विधानसभा अध्यक्षांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी राहुल नार्वेकरांवर केली. स्वतः राहुल नार्वेकरांनी दोन-तीन पक्ष बदलले आहेत. परंतु त्यांनी दिलेला निर्णय अत्यंत चुकीचा आहे, असं ठाकरे म्हणाले. तसेच या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्य न्यायालयात जाणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं.
विधानसभाध्यक्षांचा निर्णय मुर्खपणाचा-गेली दोन दिवस आदित्य ठाकरे पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. विधानसभा अध्यक्ष निकाल जाहीर करत असताना आदित्य ठाकरे यांची पाटण तालुक्यातील तळमावले (जि. सातारा) येथे सभा सुरू होती. निकाल हाती आल्यानंतर माध्यमांशी बोलताना आदित्य म्हणाले की, "मूळ राजकीय पक्षासंदर्भात विधानसभाध्यक्षांनी दिलेला निर्णय निर्लज्जपणाचा कळस आहे, लोकशाहीची हत्या करणारा आहे. हा निर्णय देशासाठी मोठे संकेत आहेत. २०२४ मध्ये अशा प्रकारची गद्दारी झाली, खोक्यांचं राजकारण झालं तर असंच त्यांना वाचवलं जाणार, हेच या निकालातून सिद्ध होतं."
लोकशाहीची निर्लज्जपणानं हत्या-आता विधानसभा अध्यक्ष असणारे राहुल नार्वेकर आमच्या पक्षात (शिवसेनेत) होते, तेव्हा ते कुठल्या पक्षप्रमुखाच्या तिकिटावर लढत होते ? असा सवाल माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी सातारा येथे माध्यमांशी बोलताना केला. लोकशाहीची एवढी निर्लज्जपणानं हत्या मी कधी पाहिली नाही. आता सुप्रीम कोर्टाकडून आम्हाला अपेक्षा आहेत. पण, त्याहून जास्त अपेक्षा जनतेकडून आहेत. या निर्णयाविरोधात कायदेशीर लढाई लढली जाईल, असंही आदित्य ठाकरेंनी सांगितलं.
त्यांची अवस्था मुसोलिनीसारखी होईल-संजय राऊत यांनी निकालानंतर बुधवारी रात्री परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, " एक दिवस बाळासाहेबांची शिवसेना संपविण्याचं स्वप्न भाजपानं पाहिलं होतं. पण, शिवसेना अशी संपणार नाही. शिवसेना प्रत्येक महाराष्ट्राच्या व्यक्तीमध्ये आहे. हा निर्णय हा निर्णय नसून एक षड्यंत्र आहे. ते महाराष्ट्राचे गद्दार असून त्यांची अवस्था मुसोलिनीसारखी होईल. पक्ष दुसऱ्या कोणाला देण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांना नाही. दिल्लीत 2-4 लोकांनी बसून ठरवले तरी, शिवसेना संपणार नाही. 40 लोक पक्ष सोडून गेले तर पक्ष त्यांचा होणार का?"
हेही वाचा-
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले अनैसर्गिक आघाड्या करणाऱ्यांना 'हा' धडा
- विरोधकांचे चुकीचे, बिनबुडाचे आणि बालिश आरोप, मी दिलेला निर्णय शाश्वतचं; नार्वेकरांची प्रतिक्रिया
- भाजपाच्या खरेदी-विक्री कौशल्याला राजमान्यता देणारा आजचा निकाल - सुषमा अंधारे