मुंबई MLA Disqualification Case : शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी मंगळवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या समोर झाली. उद्धव ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची पहिली साक्ष पार पडली. बुधवारीही त्यांची साक्ष नोंदवली जाणार आहे. मंगळवारच्या सुनावणीत दोन्ही बाजूच्या गटाच्या वकिलांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. यामुळं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील याप्रसंगी नाराजी व्यक्त केली. तसेच दोन्ही गटाच्या वकिलांनी परस्पर वैयक्तिक टिप्पणी करु नये, असंही नार्वेकरांनी ठणकावलं.
ठाकरे गटाकडून कागदपत्रे सादर : मंगळवारी झालेल्या सुनावणी दरम्यान शिवसेनेत पडलेल्या फुटीच्या वेळी पक्षाने पाठवलेल्या अधिकृत नोटीस तत्कालीन सर्व वृत्तपत्रांची कात्रणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे आभार मानण्यासाठी पाठवलेल्या सर्व पोस्ट, सर्व पुरावे ठाकरे गटाकडून सादर करण्यात आले आहेत. तर शिंदे गटाला कागदपत्रे आणि पुरावे सादर करण्यासाठी २४ नोव्हेंबरपर्यंतची मुदत विधानसभा अध्यक्षांनी दिली. याप्रसंगी ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांची साक्ष रेकॉर्डवर घेण्यात आल्यानंतर, सुनील प्रभू यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर त्यांची उलट तपासणी घेण्यात आली. उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं वकील देवदत्त कामत आणि वकील अनिल साखरे यांनी युक्तिवाद केला.
मी सुशिक्षित आहे, मला इंग्रजी समजतं : सुनील प्रभू यांची उलट तपासणी होत असताना, शिंदे गटाच्या वकिलांकडून सुनील प्रभूंनी मराठीमध्ये प्रश्न विचारण्याची मागणी केली. त्यावर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांना तुम्ही आमदार अपात्रेबाबत याचिका या इंग्लिशमध्ये दाखल केल्या आहेत, हे सत्य आहे का? असा प्रश्न विचारला. त्यावर सुनील प्रभू यांनी सांगितलं की, हो मी इंग्लिशमध्ये याचिका दाखल केली आहे. वकिलांना हिंदी आणि मराठीमध्ये मी सांगितलं होतं, त्यानंतर त्यांनी ती इंग्रजीमध्ये मांडली आणि मी समजून घेतल्यानंतर त्यावर सही केली असं म्हटलं. त्यावर प्रती प्रश्न करताना जेठमलानी यांनी सांगितलं आहे की, तुम्ही अपात्रता याचिकेमध्ये असं कुठेही सांगितलं नाही की, याचिकेत जे लिहिलं आहे ते तुम्हाला मराठीमध्ये समजावून सांगितलं आहे. त्यावर सुनील प्रभू म्हणाले की, मी सुशिक्षित आहे. मी जे काही बोललो ते सर्व रेकॉर्डवर आहे. मी आमदार असून २ ते ३ लाख लोकांनी मला निवडून दिलं आहे. मला माझ्या भाषेत समजावून सांगितल्यानंतर मी सही केली.