मुंबई- अहमदाबाद येथील ‘सरदार पटेल स्टेडियम’चं नाव बदलून ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ असे करण्यात आले आहे. त्यानंतर राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. या नामकरणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर उपोधारिक टीका केली आहे. 'आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मला सरदार पटेल यांच्यापेक्षा मोठे वाटू लागले' आहेत, असा उपरोधिक निशाणा राऊत यांनी मोदींवर साधला आहे.
पंतप्रधान मोदी मला सरदार पटेलांपेक्षा मोठे वाटू लागलेत - संजय राऊत
जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचा उद्घाटन सोहळा बुधवारी राष्ट्रपतींच्या हस्ते पार पडला. या मैदानाचे नाव आधी सरदार पटेल स्टेडियम असे होते. मात्र आता हे स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियम नावाने ओळखले जाणार आहे. यावरून आता विरोधक भारतीय जनता पक्षावर टीका करताना दिसत आहेत. त्याच प्रमाणे राऊत यांनीही टीकास्त्र सोडले आहे.
तो निर्णय झाला असेल तर मला माहिती नाही-
नाव बदलणे हा गुजरात सरकारचा निर्णय आहे, आपण त्याबाबत काय करु शकतो. गुजरात क्रिकेट बोर्डाने स्टेडियमला नरेंद्र मोदी यांचे नाव द्यायला मान्यता दिली असेल. अनेक राज्यांमध्ये अशाप्रकारचे निर्णय झाले असतील तर मला माहिती नाही. पण आता मला नरेंद्र मोदी हे सरदार पटेल यांच्यापेक्षाही मोठे वाटू लागले आहेत, अशी खोचक टीका राऊत यांनी केली आहे.
हिटलरशी तुलना -
स्टेडियमच्या नावावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही मोदींवर बुधवारी जोरदार टीका केली होती. आव्हाड यांनी तर थेट जर्मनीचा हुकूमशाह हिटलरचा दाखला देत, “हिटलर सत्तेत आल्यानंतर त्यानेही मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिले होते” “स्वातंत्र्य चळवळीतील महान नेते व गुजरातचे सुपुत्र सरदार पटेल यांच्या नावाने मते मागून थकल्यावर त्यांच्या नावे असलेले गुजरातमधील स्टेडियम स्वतःच्या नावावर करून घेतले. हिटलरने देखील सत्तेत आल्यानंतर मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिले होते”, असं ट्विट करत आव्हाड यांनी मोदींचे नाव न घेता त्यांची हिटलरसोबत तुलना केली आहे.