मुंबई- दरवर्षीप्रमाणे शहरातील शिवाजी पार्क येथे शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सध्या आरेमधील वृक्षतोडीवरून राज्यात गोंधळ सुरू आहे. या पार्श्वभूमिवर शिवसेना काय भूमिका घेणार याचीही उत्सुकता होती. मात्र, सपूर्ण कार्यक्रमात आरेबद्दल एकही शब्द उच्चारला गेला नाही. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी आमचे सरकार आले तर आरेला जंगल घोषीत करू, वृक्षतोड करणाऱ्यांना पाहून घेऊ, असे म्हणणाऱ्या शिवसेनेने तलवार म्यान केल्याची चर्चा रंगत आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राम मंदिर निर्माणाचा उल्लेख केला.
विधानसभेच्या प्रचाराचे बिगुल वाजवत शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी काँग्रेस, राष्ट्रवादीसह विरोधकांवर खरपुस टीका केली. जे शस्त्र विरोधकांनी शिवसेनेवर उगारले त्याच शस्त्राने तुम्हाला संपवले, असे ठाकरे म्हणाले.
अजित पवारांवर टीका करताना उध्दव ठाकरे म्हणाले, मगरीच्या डोळ्यात अश्रू हे ऐकले होते. परंतु, अजित पवारांच्या रूपाने मी ते अश्रू पाहिले. राजकारण सोडून शेती करणार बोलता. अजित पवार तुमच्या डोळ्यात पाणी आहे, पण धरणात पाणी नसणार तर काय करणार? तुमच्या कर्माने तुमच्या डोळ्यात पाणी आलेले आहे असे ते म्हणाले.
प्रत्येक निर्णय घेताना माझ्या मनात एकच विचार असतो की माझ्या शिवसैनिकाला काय वाटेल. तुम्ही ठेवलेला विश्वासाबद्दल मी मनापासून शिवसैनिकांचे आभार मानतो. सुडाचे राजकारण जर कोणी करायला गेले तर त्याला तोडून मोडून ठेवल्याशिवाय राहणार नाही.
शिवसेनाप्रमुख स्वतः कोर्टात हजर झाले आणि कोर्टाने सांगितले की, ही केसच होऊ शकत नाही. मागील सर्व अनुभव पाहून मी का बरे भाजप सोबत युती करायची नाही? राम मंदिर पूर्ण करण्याचे काम शिवसेना करणार. शिवसेनाप्रमुखांचे विचार आज पुर्ण जगाला पटायला लागले आहेत. ट्रम्प यांना शिवसेनाप्रमुखांचा पवित्रा कळला की भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत असे ठाकरे म्हणाले.