महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेसचा खुराडा रिकामा तर, राष्ट्रवादीची दुभती जनावरे दावणी तोडून बाहेर; शिवसेनेचा पवारांना टोला - सामनाचा अग्रलेख

शरद पवारांनी सोमवारी आपल्या पक्षातील नेत्यांच्या सोडून जाण्यावरून 'गेले ते कावळे' अशी टीका केली होती. त्यावर शिवसेनेने सामना मुखपत्रातून चांगलाच समाचार घेतला आहे. लोकसभेच्या निकालानंतर काँग्रेसचा खुराडा रिकामा होत आहे तर राष्ट्रवादीची दुभती जनावरे गोठ्यातून दावणी तोडून जात असल्याचा खरमरीत बाण शिवसेनेने सोडला आहे.

शिवसेनेचा सामनातून खरमरीत टोला

By

Published : Aug 20, 2019, 10:57 AM IST

Updated : Aug 20, 2019, 11:38 AM IST

मंबई - शरद पवारांनी सोमवारी आपल्या पक्षातील नेत्यांच्या सोडून जाण्यावरून 'गेले ते कावळे' अशी टीका केली होती. त्यावर शिवसेनेने सामना या मुखपत्रातून चांगलाच समाचार घेतला आहे. लोकसभेच्या निकालानंतर काँग्रेसचा खुराडा रिकामा होत आहे तर राष्ट्रवादीची दुभती जनावरे गोठ्यातून दावणी तोडून जात असल्याचा खरमरीत बाण शिवसेनेने सोडला आहे.

मुंबई येथे रविवारी राष्ट्रवादी पक्षातील महिला कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी शरद पवार यांनी आपल्या भाषणातून पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱ्यांचा समाचार घेतला. आज अनेक लोक पक्ष सोडत आहे. मात्र जे लोक खटल्यात आहेत त्यांच्यावर राज्यकर्ते दबाव आणत आहे. त्यामुळे पक्षगळती होत आहे. आपण पूर्ण स्वच्छ आहात तर आपल्याला कसलीच चिंता नाही. यापुढे आपण आपण सर्वांनी, कावळ्यांची चिंता करायची नाही तर मावळ्यांची चिंता करावी, असेही पवार म्हणाले होते.

शिवसेनेने आपल्या सामना या मुखपत्रातून खासदार शरद पवार यांच्यावर टीका केली. कावळ्यांची नाही, तर मावळ्यांची चिंता करावी, असे म्हणत राष्ट्रवादी पक्षातून सेना-भाजपत जाणाऱ्या नेत्यांना पवारांनी टोला लगावला होता. पवारांच्या शब्दातील रोख ओळखून शिवसेनेने अग्रलेखातून पवारांवर टीकेचे बाण सोडले आहेत.

सामनाचा अग्रलेख काय सांगतो?

जे सोडून गेले ते कावळे व आता उरलेल्या मावळ्याच्या जोरावर पक्षबांधणी करू, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. पण जे कावळे उडाले त्या कावळ्यांना इतर पक्षांच्या पिंजऱ्यातून पळवणारे कोण होते? पवारसाहेब तुम्हीच होता. राष्ट्रवादीत पंधरा वर्षे राहून सत्तेचे दाणे, चारा, वैरण खाऊन या कावळ्याचे मावळे होऊ शकले नाहीत. कावळेच ते, शेवटी कावळेच राहिले. असे अनेक कावळे शिवसेनेतून उडून गेले. तेव्हा ‘उडाले ते कावळे, राहिले ते मावळे’ या मंत्रावर शिवसेना उभी राहिली. कारण शिवसेनेत बाळासाहेबांनी घडवलेले मावळे हे जमिनीवरच राहिले. त्यामुळे 2014 च्या ‘मोदी’ लाटेतही याच मावळ्यांनी किल्ला लढवला व भगवा राखला. हा बाणा आजही शिवसैनिकांनी जपला आहे. तशी परिस्थिती काँगेस किंवा राष्ट्रवादीची आहे काय? मुळात या दोन्ही पक्षांना काही विचार, धोरण आणि दिशा उरली आहे काय? ३७० कलम हटवले म्हणून साऱ्या देशात आनंदी आनंद असताना ‘३७०’च्या बाजूने काँग्रेस-राष्ट्रवादीने उभे राहणे हे कसले धोरण? त्यामुळे काँग्रेस पक्षालाही गळतीच लागली.

२०१४ मध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्याआधीच बिनशर्त पाठिंबा देत भाजपला सरकार बनविण्याचे आमंत्रण देणारे कावळे राष्ट्रवादीचेच होते. हा चोंबडेपणा करण्याची तशी गरज नव्हती. राष्ट्रवादीच्या कावळ्यांनी तेव्हा ही फालतू ‘काव काव’ केली नसती तर पुढच्या पाच वर्षांत महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर वाहताना दिसले असते, पण पवारांनी २०१४ मध्ये जे केले त्याचेच परिणाम त्यांचा पक्ष भोगीत आहे. आपल्या अस्सल इरसाल कोकणी भाषेत बोलायचे तर ‘केले तुका आणि झाले माका!’ अशीच आज राष्ट्रवादीची स्थिती आहे. शिवसेना किंवा भाजपत कावळे येत आहेत की मावळे याचा निर्णय आम्ही घेऊच. ‘चंद्रकांत पाटील यांनी मध्यंतरी एक कटुसत्य सांगितले होते. सत्ता आहे म्हणून ‘आयाराम’ म्हणजे ‘इनकमिंग’ वाढले आहे. या ‘आयारामां’त कावळे किती आणि मावळे किती याचाही शोध आम्ही घेतच असतो. वाल्यांचे वाल्मीकी करणारे वॉशिंग मशीन तसे कुणाकडेच नाही. कधी कधी राजकारणात मजबुरी म्हणूनही ‘पदरी पडले पवित्र झाले’ या धोरणाने वागावे लागते. मग ते कावळे काय आणि राजहंस काय, चालवून घ्यावेच लागतात. महाराष्ट्रात ‘युती’ला जिथे गरज आहे तिथे नव्या मावळ्यांचे स्वागत होईल.

Last Updated : Aug 20, 2019, 11:38 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details