मुंबई -पाकिस्तानच्या ताब्यात असणारे निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांची सुटका करुन त्यांना सहिसलामत मायभूमीत आणणे हाच सरकारचा खरा पुरुषार्थ ठरेल. मोदी व शहा यांनी मनात आणले तर काय अशक्य आहे? जाधव यांच्या सुटकेसाठी बळाचा वापर करा, असे आवाहन शिवसेनेने मुखपत्र सामनातून सरकारला केले आहे.
अभिनंदनला मुक्त केले तसे कुलभूषण जाधव यांनाही करा
ज्याप्रमाणे आपल्या हवाई दलाचा वीर अभिनंदन पाकच्या हाती सापडला, पण आंतरराष्ट्रीय दबावांचा परिणाम व मोदी सरकारची भीती यामुळे अभिनंदनला पाकड्यांनी मुक्त केले. मग ते भाग्य कुलभूषण जाधव व त्यांच्या कुटुंबीयांना का मिळू नये? असा सवालही सेनेने केला आहे.
पाकिस्तानच्या तुरुंगात हिंदुस्थानी कैद्याने राहणे म्हणजे मृत्यूदंडच
हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीस तूर्त स्थगिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानचे ‘बूच’ लावले असा प्रचार सुरू आहे. हिंदुस्थानचा हा विजय असल्याचे सांगितले जात आहे. ज्या दिवशी कुलभूषण जाधव हिंदुस्थानात परत येतील तो विजय दिवस मानता येईल. तसे काही झाल्याचे दिसत नाही. पाकिस्तानने ‘व्हिएन्ना’ समझोत्याचे उल्लंघन केले असल्याचे ताशेरे हेगच्या न्यायालयाने मारले, पण हिंदुस्थानच्याही सर्वच मागण्या मान्य केल्याचे दिसत नाही. मृत्युदंडाच्या शिक्षेस स्थगिती दिली हे ठीक, पण पाकिस्तानच्या तुरुंगात हिंदुस्थानी कैद्याने राहणे, म्हणजे मृत्यूंदंडच असल्याचे सेनेने म्हटले आहे.