मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. शिखर बँक घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने शरद पवार आणि इतरांवर गुन्हे दाखल केले. यावर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, मला पवारांच्या कौटुंबीक भांडणात रस नाही, त्यामुळे शुक्रवारी ज्या घडामोडी घडल्या त्याचा आनंद होण्याचे कारण नाही. जे शिवसेनेशी वाईट वागले त्यांना त्याचे फळ मिळते, असा टोला त्यांनी शरद पवारांना लगावला.
हेही वाचा - 'माझ्यावरील कारवाईमुळे अस्वस्थ होऊन अजित पवारांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला असावा'
ठाकरे म्हणाले, संघर्ष करून सत्ता मिळवली. आपल्या कर्माने जो मरणार त्याला धर्माने मारू नका असे बाळासाहेब नेहमी म्हणायचे. तसेच या सर्वातून शिवसेना देखील गेली आहे. २००० साली पोलीस बाळासाहेबांना अटक करण्यासाठी आले होते. त्यावेळी उत्स्फूर्तपणे शिवसैनिकांनी विरोध केला होता. मी अटक करण्यासाठी न्यायालयात जातोय असे सांगून बाळासाहेब स्वतः न्यायालयात न्यायमूर्तींसमोर उभे राहिले. त्यावेळी कोणी मध्यस्थी केली नाही किंवा सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला नाही.