मुंबई- बसपा प्रमुख मायावती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्घव ठाकरे यांनी पवार आणि मायावतींवर निशाणा साधला. पंतप्रधानपदाच्या २ संभाव्य व स्वप्नाळू उमेदवारांनी माघार घेतली यातच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा धाक जाणवत आहे. या दोघांची माघार म्हणजे पंतप्रधान पदासाठी मोदी यांचा मार्ग निर्धोक आहे व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा विजय पक्का असल्याचे हे शुभसंकेत असल्याचे मत ठाकरेंनी पक्षाच्या मुखपत्रातून व्यक्त केले आहे.
पंतप्रधानपदाच्या स्वप्नाळू उमेदवारांची माघार हे शुभसंकेत; ठाकरेंचा पवार-मायावतींवर निशाणा - NCP
पंतप्रधानपदाच्या स्वप्नाळू उमेदवारांची माघार हे एनडीएसाठी शुभसंकेत... शरद पवारांनंतर मायावतींनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंचा सामनामधून निशाणा.. म्हणाले पंतप्रधानपदासाठी मोंदीचा मार्ग निर्धोक
शरद पवार यांच्या पाठोपाठ मायावती यांनीही लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. या माघार नाट्याचे महत्त्व इतकेच की, पवार ‘बहन’ मायावती हे दोघे पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार होते. निदान पंतप्रधानपदाचे स्वप्न तरी ते पाहत होते, अशी उपरोधीक टीका त्यांनी सामनातून केली आहे.
मायावती यांच्या पक्षाची जी काही ताकद आहे ती उत्तर प्रदेशातच, बाकी देशभरात त्यांच्या पक्षाला स्थान नाही. त्यामुळे देशात प्रचार करायचा म्हणून लढायचे नाही ही पळवाट आहे. अशी पळवाट पवारांनी तरुणांना संधी मिळावी असे सांगत माढा मतदारसंघात शोधली, असल्याची टीका त्यांनी केली. पवार हे राष्ट्रीय राजकारणात पुराणपुरुष आहेत. नेहमीप्रमाणे विरोधकांची मोट बांधण्याचे काम ते करीत आहेत, पण स्वतःच्या घरात व पक्षात ते अशी मोट बांधू शकले नाहीत. शेवटी त्यांनाच मैदान सोडावे लागले असल्याचे उद्धव म्हणाले.
राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे आधीच मंदावले होते. रणजितसिंह मोहिते-पाटलांच्या रूपाने निदान घड्याळाचा सेकंद काटा तरी नक्कीच गळून पडला असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. प्रियांकाच्या पर्यटन दौऱ्यास चांगली प्रसिद्धी व प्रतिसाद मिळत आहे. मायावती ज्या मतदारसंघात निवडणूक लढवतील तिथे जाऊन प्रियांका गडबड करतील ही भीती आहेच. मायावती यांना भीती भाजपची नसून काँग्रेसची आहे. आता राहुल गांधींऐवजी प्रियांका उत्तरेत लक्ष घालीत आहेत. मायावती यांनी लोकसभेतून माघार घेण्याचे हे एक कारण असावे, असा कयासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.