नवी मुंबई :रायगडच्या कर्जत खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण भूस्खलनात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 80 लोकांना वाचविण्यात प्रशासनाला यश आले आहे. मात्र घटनास्थळावर बचाव कार्यासाठी गेलेल्या नवी मुंबईतील अग्निशमन केंद्रातील अधिकारी शिवराम धुमणे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. जखमींच्या उपचारावरही सरकार खर्च करत आहे.
धाप लागून आला हृदयविकाराचा झटका :इर्शाळवाडी येथे सहा किलोमीटर अंतरावर एक वाडी आहे. या दोन किलोमीटरच्या रस्त्याने वर जावे लागते. सततच्या पावसात डोंगरावर चढत असताना अग्निशमन दलाचे जवान शिवराम धुमणे (५२) यांना हृदयविकाराचा झटका आला. इतर जवानांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी शिवराम धुमणे यांना मृत घोषित केले. नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी शिरीष दर्गीबाडा यांनी याबाबत माहिती दिली आहे. धुमणे नवी मुंबई महापालिकेच्या बेलापूर अग्निशमन केंद्रात सहाय्यक स्थानक अधिकारी होते.