मुंबई- गेले आठ महिने आपण कोरोनाच्या संकटात आहोत. युरोपमध्ये कोरोनाचा दुसरा टप्पा आपण पाहिला आहे. काहींनी अनेक वेळा रोजगाराबाबत राजकारण केले आहे. बिहारमधील निकालावरून जनता जागृत होत आहे, हे स्पष्ट होत आहे, असे शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे पत्रकार परिषदेत म्हणाल्या.
रोजगाराचा प्रश्न महत्त्वाचा आहे. ऑक्टोबर महिन्यात 20 लाख मजुरांना काम दिलेले आहे. मजूर काम करत असताना बाधित होऊ नयेत, यासाठी आम्ही प्रयत्न केले. रोजगार हमी योजनेंतर्गत आम्ही हे सर्व काही शक्य केलेले आहे. पत्रकार हे कोरोना योद्धे आहेत. महाराष्ट्र सरकारच्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेला राज्यात यश मिळत आहे, असे गोऱ्हे म्हणाल्या.
भाजप नेते किरीट सोमैय्यांवर टीका
किरीट सोमैय्या यांच्या आरोपांवर रवींद्र वायकर यांनी भाष्य केले आहे. मला याबाबत जास्त बोलणे योग्य वाटत नाही. आतापर्यंत अनेक आरोप केले, त्यातील किती सिद्ध झाले त्यावर एक पुस्तक सोमैय्यांनी नक्की काढावे. त्यांच्या आरोपांचे पुढे काय झाले? जेवणामध्ये आपण लोणचे लावतो, जे पटकन विरघळून जाते, अशी परिस्थिती सोमैय्यांची आहे. वायकर यांनी 'पाणचट' हा शब्द वापरला आहे, तो त्यांच्यासाठी योग्य आहे. 'कोर्ट सुप्रीम आहे' त्यामध्ये सोमैय्या जाऊ शकतात. १२ डिसेंबरपर्यंत गैरव्यवहाराबाबत पुरावे दिले नाहीत, तर त्यांनी माफी मागावी, असेही गोऱ्हे म्हणाल्या.
दिशा कायद्यावर महाराष्ट्र सरकार आणि विधीमंडळ यांच्यात व्यवस्थित चर्चा आहे. येत्या अधिवेशनात दिशा कायदा चर्चेला येईल, मी स्वतः उपसभापती म्हनून बोलेन. महिलांच्या प्रश्नावर राजकारण करू नये. मुली उचलून आणणारी भाषा करणारे नेते हे महिलांच्या अत्याचारावर बोलत आहेत. महिलांवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला हे सरकार आणि विधीमंडळ अजिबात पाठीशी घालणार नाही. महिलांप्रश्नी सरकार गंभीर आहे. वेगळ्या 'येसओपी' नसतील पण केंद्राने दिलेल्या 'येसओपी'च आम्ही फॉलो करतोय.