महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

“अन्यथा हिंदुत्वाचा प्रचार करू”, उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला इशारा - उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला इशारा

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवालय कार्यालयाचं उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आलं. या कार्यक्रमानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. चार राज्यांत झालेल्या निवडणुकीत भाजपाला तीन राज्यांत यश मिळालं. भाजपाची लाट आहे, असं म्हणणाऱ्यांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवाव्या, असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपाला लगावलाय.

Uddhav Thackeray press conference
Uddhav Thackeray press conference

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 5, 2023, 4:05 PM IST

Updated : Dec 5, 2023, 4:34 PM IST

उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद

मुंबई :उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मुंबईतील शिवालय कार्यालयाच्या नूतनीकरणाचं उद्घाटन करण्यात आलं. या उद्घाटनानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यासह केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. मुंबईतील धारावी प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी 16 डिसेंबरला उद्योगपती गौतम अदानी यांच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढणार असल्याची घोषणाही उद्धव ठाकरेंनी केली. तसंच मुंबई वाचवण्यासाठी सर्व मुंबईकरांनी मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं.

आणखी 1 महिना वाट बघणार नाहीतर :पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेनं हिंदुत्वाचा पुरस्कार केल्यामुळं निवडणूक आयोगानं काही वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरेंचा मतदानाचा हक्क काढून घेतला होता. आता अमित शाहांनी यांनी मध्य प्रदेश निवडणूक प्रचारात धर्म, देवाचा प्रचार केला. त्यामुळं प्रचारात धर्म, देवाचा प्रचार करणं शक्य आहे का, असं पत्र मी महिनाभरापूर्वी निवडणूक आयोगाला लिहिलं होतं. मात्र अद्यापपर्यंत निवडणूक आयोगाकडून कोणतंही उत्तर आलेलं नाही. मी आणखी एक महिना वाट पाहणार आहे. निवडणूक आयोगाकडून उत्तर न आल्यास आगामी निवडणुकीच्या प्रचारात जय भवानी, जय शिवाजी, जय गणेश, जय श्रीराम असा नाराही देईन, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबईतील अनेक प्रकल्पांमध्ये घोटाळा होत आहे. मुंबईकरांच्या सोयीसुविधात मोठा काळाबाजार झाला आहे. मुंबईतील धारावी प्रकल्प अदानी समुहासाठी असल्याचं दिसतंय. कारण प्रत्येक ठिकाणी सरकारकडून अदानी समुहाला प्रकल्प मिळतायत. मुंबई मराठी माणसाची आहे, ती कोणाच्याही घशात जाऊ देणार नाही - उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख (उबाठा गट)

सरकार कुठंय? :अवकाळीमुळं राज्यातील शेतकरी हतबल झाला आहे. अवकाळी पाऊस, गारपिटीमुळं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. शासनानं तात्काळ शेतकऱ्याला मदत करावी. मात्र, दुर्दैवानं शासनाकडून शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळालेली नाही. बळीराजा अडचणीत असताना सरकार निवडणुकीत व्यग्र होतं असा टोलाही त्यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.

हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या : देशातील पाच राज्यांमध्ये नुकत्याच निवडणुका झाल्या. यापैकी तीन राज्यात भाजपाला यश मिळालं. मी भाजपाचं अभिनंदन करतो, ते लोकशाही पद्धतीनं निवडून आले, हे योग्यच आहे. मात्र अनेकांना ईव्हीएम मशीनवर शंका येत आहे. त्यामुळं ईव्हीएमचा हा गोंधळ कायमचा दूर झाला पाहिजे. भाजपाला आता यश मिळालं, असे मी म्हणतो, त्यामुळं आगामी लोकसभा निवडणूक एकदाच बॅलेट पेपरवर घेण्याची हिंमत भाजपानं दाखवावी, असं आव्हानही उद्धव ठाकरेंनी दिलं.

मुंबई कुणाच्याही घशात जाऊ देणार नाही : मुंबईतील अनेक प्रकल्पांमध्ये घोटाळे होत आहेत. मुंबईकरांना सोयीसुविधा मिळत नाहीत. मुंबईतील धारावी प्रकल्प अदानी समुहासाठी असल्याचं दिसतं. कारण प्रत्येक ठिकाणी सरकारकडून मोठे प्रकल्प अदानींना मिळत आहेत. मुंबई मराठी माणसाची आहे. त्यामुळं मुंबई कोणाच्याही घशात जाऊ देणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. धारावी वाचवण्यासाठी आम्ही 16 तारखेला धारावी ते अदानी समुहाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा -

  1. तीन राज्य गमावल्यानंतर काँग्रेसला राज्याच्या राजकारणात बसणार मोठा फटका, जाणून घ्या राजकीय विश्लेषण
  2. राज्यात 75 ठिकाणी उभारणार नाट्यगृह, 386 कोटी रुपये देण्यात येणार- सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा
  3. मराठा आरक्षणाबाबत उद्या सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी, मराठा बांधवांना मिळणार का दिलासा?
Last Updated : Dec 5, 2023, 4:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details