मुंबई: तिवसा तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख धीरज अंबादास राजूरकर यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी, शिवसेना घेत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. धीरज राजूरकर यांचा वर्धापन दिन मेळाव्यानंतर हृदयविकाराने मृत्यू झाला होता. मुख्यमंत्र्यांनी आज त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. धीरज अंबादास राजूरकर हे सोमवारी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या मेळाव्यासाठी मुंबईत शिवसैनिक कार्यकर्त्यांसह दाखल झाले होते. तिवसा तालुक्यातील अनेक शिवसैनिक शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई दाखल झाले होते. यावेळी तालुकाप्रमुख धीरज अंबादास राजूरकर हे सुद्धा त्यांच्यासोबत मुंबईत आले.
राजुरकर यांची मेळाव्याला हजेरी :शिवसेना शिंदे गटाचे तिवसा तालुका प्रमुख धीरज अंबादास राजूरकर हे गोरेगाव नेस्को येथे झालेल्या वर्धापन दिनाच्या मेळाव्याला आवर्जून उपस्थित झाले होते. या मेळाव्यानंतर ते हॉटेलमध्ये परत आल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. धीरज राजूरकर यांना उपचारासाठी जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
मुख्यमंत्र्यांनी घेतले पार्थिवाचे अंत्यदर्शन : दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील जीटी रुग्णालयाला भेट देऊन धीरज राजूरकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, शिवसेना हा एक परिवार असून यातील प्रत्येक सदस्य हा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. धीरजचा आकस्मिक मृत्यू हा आम्हाला आणि सर्व शिवसैनिकांना चटका लावून जाणार आहे. धीरज हा पक्षाने दिलेल्या प्रत्येक आदेश मानून त्याप्रमाणे अतिशय उत्तम काम करीत होता. मात्र काळाने त्याच्यावर घाला घातला आहे. आम्ही सगळे त्यांचे सहकारी आणि शिवसैनिक त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असून त्यांच्या कुटुंबाची पुढील सर्व जबाबदारी शिवसेनेच्या वतीने स्वीकारत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी जाहीर केले.