मुंबई- शिवसेना पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांच्या मागण्यांना समर्थन देत असून शेतकऱ्यांच्या देशव्यापी बंदलाही पाठिंबा देत आहे, अशी घोषणा शिवसेनेचे नेते आणि मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी रविवारी (दि. 6 डिसें.) मुंबईत केली.
अकाली दलाच्या नेत्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्या आणि आंदोलनाविषयी प्रदीर्घ चर्चा केली. विविध पक्षांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या आंदोलनात सहभागी विविध पक्षांचे नेते उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत, त्यांच्याशी चर्चा करत आहेत. या आंदोलनाबाबत शिवसेनेची नेमकी भूमिका काय, याविषयी देशभरात औत्सुक्य आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना संजय राऊत पुढे म्हणाले, गेल्या 11 दिवसांपासून पंजाब-हरियाणाचा शेतकरी त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. दिल्लीच्या वेशीवर कडाक्याच्या थंडीत सरकारी दडपशाहीची पर्वा न करता ते संघर्ष करत आहे. पंजाब-हरियाणाच्या शेतकऱ्याने देशाच्या अन्नधान्य उत्पादनात नेहमीच मोलाचे योगदान दिले. आज तोच शेतकरी केंद्र सरकारने लादलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरला आहे. जीवनमरणाचा लढा म्हणूनच तो सरकारशी दोन हात करत आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी
केंद्राने 11 दिवसांनंतरही या आंदोलनावर तोडगा काढला नाही. त्यामुळे शेतकरी आंदोलकांनी देशव्यापी बंदची हाक दिली. हा बंद यशस्वी व्हावा, शेतकऱ्यांच्या मागण्यांचा आवाज जगभरात जावा हीच शिवसेनेची भावना आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेना तसेच महाविकास आघाडी सरकारने सतत सकारात्मक, समन्वयाची भूमिका घेतल्याने पंजाब-हरियाणासारखी परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवू शकत नाही. पण, पंजाब-हरियाणाचा शेतकरी आंदोलनात उतरला हे केंद्राचे अपयश आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.
बंदमध्ये सहभागी व्हा