मुंबई: लॉरेन्स बिश्नोई गॅंगने मुंबई पोलिसांची झोप उडवली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देऊन लॉरेन्स बिश्नोई गँगने खळबळ माजवली होती. आता संजय राऊत यांना धमकीचे मेसेज आल्यानंतर कांजूर मार्ग पोलीस ठाण्यात संजय राऊत यांनी लेखी तक्रार दिली आहे. त्यानंतर मुंबई पोलीसांनी तपासाची चक्रे तात्काळ वेगाने फिरवली आहेत. या घटनेत पुणे पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेऊन मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या आरोपीने धमकी देताना लॉरेन्स बिश्नोईंच्या नावाचा वापर केल्याने सलमान खान धमकी प्रकरणात याचा काही सहभाग आहे का हेही तपासण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपीचा लॉरेन्सशी संबंध नाही - खासदार संजय राऊत धमकी प्रकरणी डीसीपी पुरुषोत्तम कराड यांनी पत्रकार परिषद घेतली. खासदार संजय राऊत यांना धमकी देणारा राहुल तळेकर याचा लॉरेन्स बिश्नोई याच्याशी कुठलाही संबंध नसल्याचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम खराड यांनी सांगितले आहे. राहुल तळेकर हा पुण्यातील रहिवासी असून, त्याचे स्वतःचे हॉटेल आहे. रात्री संजय राऊत यांची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर त्याने संजय राऊत यांचा नंबर मिळवून त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु संजय राऊत यांनी त्याचा फोन उचलला नाही म्हणून त्याने राऊत यांना लॉरेन्सच्या नावाने धमक्या दिल्या असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
दारुच्या नशेत आरोपीने दिली धमकी - मुंबई पोलिसांचे पथक हे राहुल तळेकर याला कांजुर पोलीस ठाण्यात आणून त्याची अधिक चौकशी करणार आहे. युट्यूबवर सरफिंग करताना त्याला लॉरेन्सबद्दल माहिती मिळाली होती. त्यामुळे त्याने संजय राऊतांना धमकी देताना लॉरेन्सचे नाव घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
लॉरेन्स बिश्नोई विरोधात गुन्हा -संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबईतील कांजूर मार्ग पोलिस ठाण्यात लॉरेन्स बिश्नोई याच्याविरुद्ध कलम ५०६(२) आणि ५०४ आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय राऊतांची प्रतिक्रिया - मला धमकी आल्याचे प्रकार अनेकवेळा घडले आहेत. शिंदे सरकार आल्यानंतर माझी सुरक्षाही कमी केली आहे. मुख्यमंत्र्यांचा मुलगा एका गुंडाला सोबत घेऊन माझ्यावर हल्ला करण्याचा प्लॅन करत होता. यावर मी एक पत्रही लिहिले होते. मात्र, हा एक स्टंट असल्याचे मला सांगण्यात आले होते. मी जर खरे बोलायचे ठरवले तर मोठा राजकीय भूकंप येईल, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी धमकी प्रकरणावर दिली आहे.