महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विचारसरणी वेगळी असली तरी किमान समान कार्यक्रमावर सरकार कार्यकाळ पूर्ण करेल - सुभाष देसाई

कोरोनाच्या काळात अनेक युवकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांचे व्यवसाय बुडाले. या अवस्थेतूतन युवकांना बाहेर काढण्यासाठी राज्याच्या उद्योग विभागाने पुढाकार घेऊन 'महाजॉब्स पोर्टल' सुरू केले. या पोर्टलच्या पहिल्याच दिवशी ६० हजार ५९४ युवकांनी तर ५०३ कंपन्यांनी नोंदणी केल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी दिली.

उद्योगमंत्री सुभाष देसाई
उद्योगमंत्री सुभाष देसाई

By

Published : Nov 27, 2020, 10:41 AM IST

मुंबई- महाविकास आघाडी सरकारचा सत्तेचा प्रयोग महाराष्ट्रात राबवला जात असून या सरकारने एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. या निमित्त शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी संवाद साधला असता देसाई यांनी मान्य केले की, आघाडीतील पक्षांची विचारसरणी वेगळी असली तरी किमान समान कार्यक्रमावर सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल.

संपूर्ण मुलाखत पहा>>किमान समान कार्यक्रमावर सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल - सुभाष देसाई<<

राज्यातील विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर राजकीय पेच निर्माण झाला. या संघर्षमय वातावरणात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. आता देशात विभिन्न विचारसरणीच्या पक्षांची सरकारे स्थापन होत असून जनतेने विकासाच्या मुद्यावर आम्हाला स्वीकारले असल्याचे देसाई यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले. विरोधकांनी वारंवार सरकार स्थापन करण्याच्या वल्गना करू नयेत, केवळ विकासाच्या मुद्यावर आम्ही आमचा कार्यकाळ पूर्ण करू, असे सांगत देसाई यांनी विरोधकांना सुनावले. त्याचबरोबर वर्षभराचा काळ कोरोना महामारीशी लढण्यात गेला. या स्थितीतही विरोधकांनी राजकारण केले. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकारने जनतेला सुविधा आणि आधार देण्याचा प्रयत्न केला असल्याचे ते म्हणाले. सरकारच्या वर्षभराच्या कार्यकाळाबाबत बोलताना देसाई यांनी त्यांच्या उद्योग विभागावरही भाष्य केले.

चिनी कंपन्यांसोबत झालेले करार स्थगित..

जगात कोरोनाने हाहाकार माजवल्यानंतर चीनबाबत सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत होता. त्याचबरोबर सीमेवर चीनने कुरघोड्या करण्यास सुरुवात केली होती. त्याआधी महाराष्ट्र सरकारने चिनी कंपन्यांसोबत एक हजार सातशे कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले होते. देशात चीनला विरोध वाढत असतानाच केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार चीनचे सामंजस्य करार विचाराधीन ठेवण्यात आले होते. मात्र, महाराष्ट्र सरकारने हेंगली, पीएमआय इलेकट्रो, फोटॉन, ग्रेट वॉल मोटर्स या कंपन्यांच्या करारांना आता स्थगिती दिल्याचा खुलासा देसाई यांनी केला.

बेरोजगार युवकांसाठी महाजॉब पोर्टल..

कोरोनाच्या काळात अनेक युवकांच्या नोकऱ्या गेल्या अनेकांचे व्यवसाय बुडाले. या अवस्थेतूतन युवकांना बाहेर काढण्यासाठी राज्याच्या उद्योग विभागाने पुढाकार घेऊन महाजॉब्स पोर्टल सुरु केले. या पोर्टलच्या पहिल्याच दिवशी ६० हजार ५९४ युवकांनी तर ५०३ कंपन्यांनी नोंदणी केल्याची माहिती देसाई यांनी दिली.

महाराष्ट्रात उद्योग वाढीच्या दृष्टीने ड्रायपोर्ट्स..

राज्याच्या विविध भागातून उत्पादित होणाऱ्या मालाला देश विदेशात बाजारपेठ मिळावी. त्यांच्या मालाची निर्यात व्हावी यासाठी जालना, वर्धा, नाशिक आणि सांगली इथे ड्रायपोर्टची योजना विकसित केली जात आहे. या योजनेची सुरुवात जालना येथून सुरू होत असून डिसेंबर महिन्यात या ड्रायपोर्टला सुरुवात होत आहे.

महाराष्ट्रात विदेशी गुंतवून वाढवण्याच्या प्रयत्न..

राज्यात विदेशी गुंतवणूक वाढून रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी उद्योग विभाग प्रयत्नशील असल्याचे उद्योगमंत्री देसाई यांनी सांगितले. कोरोना काळ असतानाही गेल्या सहा महिन्यात तब्बल ५० हजार कोटी रुपयांची विदेशी गुंतवणुकीचे उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे. यातील अनेक उद्योग लवकरच सामंजस्य करार करतील, असा विश्वास त्यांनी वर्तवला आहे.

मराठी भाषा ही प्रशासकीय व्यवहाराचीही भाषा व्हावी..

उद्योगमंत्री देसाई यांच्याकडे मराठी भाषा विभागही असून मराठी भाषा व्यवहारासह प्रशासकीय बाबतीत वापरात यावी, यासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही मराठी भाषा विभागाने पाठवलेल्या पत्राला सकारात्मक उत्तर दिले आहे. लवकरच याबाबतचा निर्णय होईल, असेही देसाई यांनी सांगितले. मराठी माणसांसाठी ज्ञानेश्वरी हा बहुमूल्य ठेवा आहे. प्रत्येक मराठी माणसाच्या घरात ज्ञानेश्वरी पोहचावी यासाठी ज्ञानेश्वरीचे ऑडिओ बुक काढणार असल्याची माहितीही त्यांनी दिलीय. एकूणच गेल्या वर्षभरात सरकारच्या कार्यपद्धतीचा उल्लेख देसाई यांनी केला असून राजकीय भाष्य करताना विरोधकांना ही खडे बोल सुनावले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details