महाराष्ट्र

maharashtra

बाळासाहेबांच्या स्मारकाला निधी मंजूर झाल्याने शिवसैनिकांनी व्यक्त केला आनंद

By

Published : Mar 9, 2021, 7:42 AM IST

काल(सोमवारी) राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यात बाळासाहेब ठाकरेंच्या मुंबईतील स्मारकासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.

Balasaheb Thackeray
बाळासाहेब ठाकरे

मुंबई -शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दादरमधील स्मारकासाठी ४०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद यावर्षीच्या अर्थसंकल्पात करण्यात आली. अनेक वर्षांपासून रखडलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

स्मारकाला निधी मंजूर झाल्याने शिवसैनिकांनी व्यक्त केला आनंद

दोन टप्प्यात पूर्ण होणार स्मारक -

महापौर निवासात ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. यासाठी दोन टप्प्यांमध्ये काम करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात स्थापत्य, विद्युत, वातानुकुलित यंत्रणा उभारणी, इमारतीच्या अंतर्गत आणि बाह्य सजावट, वाहनतळ उभारणी, बाग-बगीचा तयार करणे, रेनवॉटर हार्वेस्टिंग इत्यादी कामे केली जातील. दुसऱ्या टप्प्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान, लेझर शो, ग्रंथालय, चित्रपट आदी कामांचा समावेश आहे. या सर्व कामांसाठी पहिल्या टप्प्यात अंदाजे 250 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. स्मारक निर्मितीच्या दुसऱ्या टप्प्यात तंत्रज्ञानाशी संबंधित मोठी कामे होतील. लेझर शो, डिजिटल मॅपिंग, डिजिटल यंत्रणेच्या मदतीने स्मारकात वेगवेगळ्या टप्प्यावर बाळासाहेब ठाकरे यांच्या कारकिर्दीची माहिती देणारी ऑडिओ-व्हिडीओ यंत्रणा उभारण्यात येईल. या कामासाठी १५० कोटी रुपयांचा खर्च केला जाईल. हे स्मारक लवकरच उभे राहणार म्हणून शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

शिवसैनिक आनंदी -

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी जो निधी मंजूर करण्यात आला आहे, त्याबद्दल मी महाविकास आघाडीचा आभारी आहे. बाळासाहेबांचे भव्य स्मारक व्हावे ही सर्वसामान्य शिवसैनिकांची भावना आहे, असे माजी उपविभाग प्रमुख जगदीश शेट्टी यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक होणे ही प्रत्येक शिवसैनिकांसाठी आनंदाची बाब आहे. खऱ्या अर्थाने या स्मारकाच्या माध्यमातून सामान्य जनतेला आणि शिवसैनिकांना एक वेगळी ऊर्जा मिळेल, असे शिवसैनिक अभिजीत चव्हाण यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी चारशे कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, सर्व सामान्य शिवसैनिकांसाठी ही आनंदाची बाब आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने गेल्या पंधरा महिन्यात असंख्य काम केली आहेत, असे शिवसैनिक वेंकटेश अय्यर यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details