मुंबई: 'जय महाराष्ट्र' म्हणत आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरवात केली. मंचावर उपस्थित असलेल्या नेत्या आणि नेत्यांचे आणि संविधान रक्षक यांचे स्वागत करतो. आमच्याकडे खुर्च्या रिकाम्या दिसत नाही. या सभेत सर्व संविधान रक्षक म्हणून आपण सर्व इथे जमलो आहोत. जेव्हा वज्रमूठ सभेसाठी बैठका झाल्या तेव्हा ही सभा 1 मे रोजी मुंबईला व्हावी, असा आपण हट्ट धरला होता. आज काय परिस्थिती आहे. राज्य 9 ते 10 महिन्यात अंधारात गेले, त्यातून राज्याला बाहेर काढायचे आहे. हे घटनाबाह्य सरकार असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली.
आदित्य ठाकरेंच्या भाषणाने सभेला सुरुवात: छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आज मुंबईत तिसरी वज्रमूठ सभा घेतली जात आहे. या सभेला आज विशेष महत्त्व आहे. कारण आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस आहे. त्यामुळे या सभेत संबोधित करताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचे आजचं भाषण महत्त्वाचे मानले जात होते. वज्रमूठ सभेच्या सुरुवातीला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सर्वप्रथम या सभेला संबोधित केले. यावेळी मुंबई ही दिल्लीसमोर कधीही झुकणार नाही, असे आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केले.
मुंबईला मोडण्याचा भाजपचा मनसुबा: आतापर्यंत जे सरकार सत्तेत होते त्यांनी कधी मुंबईला झुकवण्याचे काम केले नाही किंवा मुंबईला मोडण्याचे काम केले नव्हते; पण या सरकारचा स्पष्ट मनसुबा आहे की मुंबईला महाराष्ट्रापासून मोडायचे. मुंबईला दिल्ली समोर झुकवायचे आहे. मी इशारा देतो, तुम्ही आम्हाला झुकवायला निघालात तर हा महाराष्ट्र तुम्हाला मोडेल पण वाकणार नाही. झुकणार नाही, अशा इशाराच आदित्य ठाकरेंनी मोदी आणि शिंदे सरकारला दिला.