मुंबई- शरद पवारांच्या फलटण येथील कार्यकर्ता मेळाव्यात आपल्या नेत्याला न्याय आणि सन्मान मिळत नसल्याने कार्यकर्त्यांनी भर सभेत राडा केला होता. त्याच कार्यकर्त्यांचे नेत शेखर गोरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत मातोश्रीची वाट धरली आहे.
शेखर गोरेंनी 'घड्याळ' काढून बांधले 'शिवबंधन'
आज (गुरूवार) मातोश्रीवर असंख्य कार्यकर्त्यांसह शेखर गोरे यांनी शिवसेनेत प्रवेश करत शिवबंधन बांधले. आगामी निवडणुकीला शिवसेनेकडून काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात चांगला टक्कर देणारा माणुस भेटला आहे. शेखर गोरे हे आमदार जयकुमार गोरे यांचे लहान बंधू आहेत.
दोन भावांच्या कट्टर वादाचा फायदा शिवसेनेने घेतला आहे. काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांना टक्कर देण्यासाठी शिवसेनेने जयकुमार यांचे बंधू शेखर गोरे यांना शिवसेनेत घेतले आहे.
शेखर गोरे यांनी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून माण तालुक्यात भरीव कार्य केले आहे. यासाठी त्यांनी ९ पोकलेन (जेसीबी) स्वखर्चाने उपलब्ध करून दिले होते.
शेखर गोरे यांनी पाच वर्षांपूर्वी काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तर आमदार जयकुमार गोरे हे काँग्रेसमध्ये गेल्या दोन टर्ममध्ये आमदार म्हणून कार्यरत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आजपासून शिवसेना वाढविण्यासाठी सातारा जिल्ह्यात काम सुरू केले.
शिवबंधन बांधल्यानंतर गोरे म्हणाले, लोकसभेच्या अगोदरच मी राष्ट्रवादीतून बाहेर पडलो आहे. पक्षाध्यक्ष शरद पवारांकडे मी न्याय मागण्याचा प्रयत्न केला. पण, मला न्याय मिळाला नाही. राष्ट्रवादीची पाळेमुळे त्या ठिकाणावरुन बाहेर निघालेली आहे. कार्यकर्त्यांच्या मदतीने राष्ट्रवादी मी तिथे उभी केली होती. पण, आता शिवसेनेसाठी मी काम करणार आहे. राष्ट्रवादीतील काही नेतेमंडळी पक्ष संपवण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही शेखर गोरे यांनी सांगितले.