मुंबई - दिल्लीत शेतकऱ्यांनी कृषी कायद्याविरोधात सुरू केलेल्या आंदोलनावरून देशाचे लक्ष विचलित व्हावे, म्हणूनच काही लोकांकडून संयुक्त पुरोगामी आघाडीचे (युपीए) नेतृत्व शरद पवार करतील आणि तेच पुढे पंतप्रधान होतील अशा प्रकारची चर्चा सुरू करण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.
असा प्रस्ताव युतीसमोर आला नाही -
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे
शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्षपद अथवा त्यांचे नेतृत्व द्यावे, अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव महाविकास आघाडी आणि युतीच्या समोर आलेला नाही आणि तशी चर्चाही कुठे सुरू नाही. परंतू, या बातम्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात असल्याचेही तपासे म्हणाले.
राज्यातील महाविकासआघाडी सारखा प्रयोग देशपातळीवर
राज्यातील महाविकासआघाडी सारखा प्रयोग देशपातळीवर करण्यासाठी शरद पवार यांनी केंद्रातील यूपीएचे नेतृत्व राष्ट्रीय स्तरावर स्वीकारावे आणि राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षांची मोट बांधली जावी, असा आग्रह काँग्रेसकडून केला जात असल्याची चर्चा विविध माध्यमांतून सुरू करण्यात आली आहे. मात्र, यावर काँग्रेसकडून कोणतीही भूमिका मात्र स्पष्ट करण्यात आली नाही. याच पार्श्वभूमीवर तपासे यांनी शरद पवार यांच्या नावाची चर्चा जाणीवपूर्वक सुरू करून केंद्रातील मोदी सरकार विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाकडे लक्ष विचलित करण्यासाठी हे एक षड्यंत्र असल्याचा दावा तपासे यांनी केला आहे.
विरोधकांची एकजूट होण्याची गरज
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्यंक मंत्री नवाब मलिक यांनीही महाविकास आघाडी सारखा प्रयोग केंद्रीय स्तरावर देखील व्हावा, अशी मागणी केली जात असल्याचे सूतोवाच केले आहे. तसेच त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आज घडीला विरोधकांना एकजूट करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने आपण काम करत असल्याचे पवारांनी यापूर्वी सांगितले होते. मात्र, या एकजुटीचा नेता कोण होईल हे आता समोर नाही. परंतु, एकजूट करण्याचे काम पवार साहेब करत असल्याचे मलिक यांनी सांगितले. केंद्रातील सरकारला देशातील जनता कंटाळली असून देशातील गरीब शेतकरी सर्वसामान्य व्यक्तीच्या मनात या केंद्र सरकारच्या एकूणच धोरणाविरोधात रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या काळात विरोधकांची एकजूट झाली आणि देश देशात विरोधक एकत्र झाले तर निश्चितच परिवर्तन होईल, असेही मलिक यांनी म्हटले आहे. मात्र, यूपीए नेतृत्व संदर्भात अद्याप कुठलीही चर्चा नाही आणि पवारांनी ही तशी इच्छा दर्शवली नाही असेही मलिक यांनी स्पष्ट केले.