पुणे/मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दोघेही पुण्यातील लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवारांनी या सोहळ्याला उपस्थित राहू नये, असे आवाहन काँग्रेसच्या वतीने जाहीरपणे, तर शिवसेनेच्या वतीने अप्रत्यक्षपणे करण्यात आले होते. मात्र तरीही शरद पवारांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावलीच.
शरद पवारांच्या उपस्थितीचे कारण? : शरद पवार हे या कार्यक्रमाला का उपस्थित राहिले, याचे कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. 'शरद पवार हे केवळ राजकीय नेते नाहीत. ते साहित्य, संस्कृती आणि क्रीडा या तीनही क्षेत्रात लीलया वावर करतात. यासह त्यांचे पुण्यातील सांस्कृतिक क्षेत्राशी देखील जवळचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याकडे केवळ राजकीयदृष्ट्या पाहू नये. शरद पवारांची उपस्थिती सांस्कृतिकदृष्ट्या देखील तितकीच महत्त्वाची आहे', असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
मोदींचे पवार प्रेम :टिळक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या पुरस्कार सोहळ्याच्या व्यासपीठावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचा हात हातात घेतला होता. तसेच शरद पवारांनी देखील मोदींच्या पाठीवर हलकेच थोपटल्याचे पाहायला मिळाले. दोघेही नेते एकमेकांशी खळखळून हसून बोलताना दिसले. त्यानंतर पंतप्रधानांनी अजित पवार यांच्याशी हस्तांदोलन केले व त्यांच्या दंडावर हलकेच थोपटले. अन्य नेत्यांच्या तुलनेत, शरद पवार आणि अजित पवार यांच्याशी मोदींचे प्रेम अधिक दिसले अशी चर्चा आता सुरू झाली आहे.