मुंबई : खासदार संजय राऊत यांना धमकी देणार्या दोन संशयितांना गोवंडीतून गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. दरम्यान या धमकीनंतर शरद पवार आणि संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या धमकीची गृहविभागाने गंभीर दखल घेत पोलीस आयुक्तांना संबंधित दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मनोज शंकर आमरे हे राष्ट्रवादीचे मुंबई तालुका अध्यक्ष आहेत. त्यांच्या लेखी अर्जाद्वारे एल. टी. मार्ग पोलिसांनी शरद पवार यांना ट्विटद्वारे धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. मनोज आमरे हे त्यांच्या घरी असताना त्यांना त्यांच्या परिचित डॉक्टरसह पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयावर अपलोड झालेली एक पोस्ट पाठविली होती.
धमकी आणि खिल्लीही:'राजकारण महाराष्ट्राचं' या फेसबुक अकाऊंट प्रोफाईलचे नाव नर्मदाबाई पटवर्धन आहे. त्यात शरद पवारांना तुझा लवकरच दाभोलकर होणार असा मजकूर पोस्ट केलेला दिसला. तसेच सौरभ पिंपळकर याच्या ट्विटर प्रोफाईलवरून आयुष्यभर सुपारी खाल्ल्याने औरंगजेबचे तोंड मरताना वाकडं होऊन मेलं म्हणते हे खरं आहे का? असे असेल तर पुनरावृत्ती करणार, अशी पोस्ट केलेली दिसली.
दोषींवर कारवाई करण्याची मागणी:या दोन्ही प्रोफाईलवरून प्रत्यक्षपणे शरद पवार यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्याची राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी गंभीर दखल घेत सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्ताशी भेट घेतली होती. तसेच लेखी अर्जाद्वारे त्यांच्याकडे संबंधित दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. या निवेदनानंतर मनोज आमरे यांच्या तक्रारीवरून एल. टी. मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि सायबर सेलकडून तपास सुरू झाला आहे. जिवे मारण्याची धमकीवजा मॅसेज अपलोड करणार्या व्यक्तींची नावे समजली असून त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
राऊतांना धमकीचा कॉल :ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी ठाकरे गटाचे आमदार सुनिल राऊत यांना धमकीचा कॉल आला होता. यावेळी अज्ञात व्यक्तीने संजय राऊत यांची सकाळची पत्रकार परिषद म्हणजेच 9 चा भोंगा बंद झाला नाहीतर त्यांना गोळ्या घालू, अशी धमकी दिली होती. या धमकीनंतर सुनिल राऊत यांनी कांजूरमार्ग पोलिसांत तक्रार केली आहे. संजय राऊत यांना यापूर्वीही चार ते पाच वेळा धमकी आल्या आहेत. याबाबत त्यांनी काही पुरावे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. मात्र, संबंधितावर अद्याप कुठलीही आरोप कारवाई झालेली नाही. दरम्यान या धमकीनंतर गुन्हे शाखेच्या एका विशेष पथकाने गोवंडीतून दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांनीच ही धमकी दिल्याचे बोलले जाते. त्यांचा कुठल्या पक्षाशी संबंध आहे का, धमकी देण्यामागे त्यांचा उद्देश काय होता याची पोलीस चौकशी सुरु आहे.
हेही वाचा:
- शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणारा, अमरावतीतील भाजपचा कार्यकर्ता सौरभ पिंपळकर
- Sharad Pawar : जिवे मारण्याच्या धमकीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
- Sanjay Kakade News: भाजप नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यावर बंदी आणावी- संजय काकडेंची रोखठोक मागणी