मुंबई Sharad Pawar In Women Gathering Mumbai :राष्ट्रवादी काँग्रेसचा महिला मेळावा आज झाला. यावेळी पक्षध्यक्ष शरद पवार यांनी महिलांना मार्गदर्शन केलं. तसंचसंघटनात्मक आणि अन्य विषयांच्या संदर्भात मेळाव्यात महिलांनी भूमिका मांडली. महिला धोरण, आरक्षण या संदर्भात नगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत समिती, सहकारी संस्था यांच्यासाठी घेतला. या निवडणुकांवरून आपल्याला पाहायला मिळालं की कर्तृत्वाचा मक्ता फक्त पुरुषांकडे असतो, असं नाही. जो समाज आहे तो खरा नाही, संधी मिळाली तर भगिनीसुद्धा उत्तम काम करतात. हे तुम्ही सर्वांनी दाखवून दिलं असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महिला मेळाव्याला संबोधित करताना म्हटलं आहे.
सातबारावर पती-पत्नी दोघांचं नाव हवं :आपल्या काळात काही निर्णय घेतले होते. त्यातला प्रॉपर्टीत महिलांना अधिकार याची म्हणावी तशी अंमलबजावणी झाली नसल्याची खंतही शरद पवार यांनी बोलून दाखवली आहे. माझ्याकडे सत्ता असताना शेतकऱ्यांच्या जमिनीच्या सातबारावर पती-पत्नी दोघांची नावं असली पाहिजे असा निर्णय घेतला होता. हा निर्णय काही ठिकाणी राबवला गेला; मात्र शंभर टक्के सर्वच ठिकाणी हे राबवले गेले नाही. अशा प्रकारचे कार्यक्रम हातात घेऊन सरकारपुढे आग्रह धरावा लागेल.
जनतेच्या प्रश्नांसाठी केसेस अंगावर घ्या :संरक्षण मंत्री असताना मी महिलांना तिन्ही दलात आरक्षण द्यायचा निर्णय घेतला. यामुळे दिल्लीतील प्रजासत्ताक दिनी परेडमध्ये महिला दिसतात. एका बाजूला जमेची बाजू आहे तर दुसऱ्या बाजूला मणिपूरमध्ये महिलांची धिंड काढली जाते, व्यक्तिगत हल्ले केले जातात, जिवंत मारले जाते हे भारतात होत आहे. त्यामुळे या सर्व प्रश्नांबद्दल जागृत राहण्याबाबत भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. असा प्रकार घडेल त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरलेच पाहिजे. त्यासाठी केसेस होतील, काही घाबरायची गरज नाही. त्यासाठी विद्या चव्हाण यांच्यावर भरपूर केसेस आहेत. लोकांच्या प्रश्नांसाठी केसेस आहेत. सरकार बदललं की आपली लोक येतात आणि त्यावेळेस आपण केसेस काढून टाकत असतो. त्यामुळे ती चिंता करू नका, असंही पवारांनी महिलांना म्हटलं आहे. रास्त प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणार हा आपला हक्क असल्याची भूमिका समजून घेतली पाहिजे.
तर लोक याचा जाब विचारतील :राज्य सरकार समायोजन करत असताना त्यासाठी काही शाळा बंद करत आहेत. सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली. या सर्व गोष्टी असताना महाराष्ट्रात शाळा बंद करणे यासाठी आमच्या सावित्रीच्या लेकी गप्प बसल्या तर लोकं याचा जाब आपल्याला विचारतील. माझा आग्रह आहे की, तुमच्या परिसरातील प्राथमिक शिक्षणापासून विद्यार्थ्यांना बाजूला ठेवण्याचा सरकारचा जो डाव सुरू आहे तो थांबवला पाहिजे. त्यासाठी आपण काळजी घ्यावी असे आवाहन शरद पवार यांनी महिला कार्यकर्त्यांना केलं आहे.