बारामती(पुणे) Sharad Pawar on BJP : भारत देशाचा संपूर्ण नकाशा डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक राज्याचा विचार केला असता, ६० टक्के पेक्षा जास्त राज्यात भाजपाची सत्ता नाही. तसेच आगामी काळात हे चित्र देखील बदलेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी व्यक्त केला. ते बारामतीत एका खासगी कार्यक्रमात बोलत होते.
किती राज्यात भाजपाचे सरकार नाही : केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, राजस्थान, दिल्ली, पंजाब, झारखंड या राज्यांमध्ये भाजपाची सत्ता नाही. गोव्यामध्ये काही आमदार फोडले तसेच महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंचे सरकार होते. मात्र, काहींनी वेगळी भूमिका घेतल्याने हे राज्य गेली. मध्यप्रदेशमध्ये सध्या निवडणुका झाल्या आहेत. त्याचा निकाल लागेल तो लागेल.. या आधी तेथे कमलनाथ मुख्यमंत्री होते. त्यांच्या नेतृत्वात राज्य होतं. तिथे काही आमदार फोडले गेले आणि नंतर तिथे शिवराजसिंह चव्हाण यांचं सरकार आलं. एकंदरीत देशाचा विचार केला असता. ६० टक्क्यांपेक्षा जास्त राज्य भाजपाच्या हातात नाहीत. हा सध्याच्या लोकांचा कल आहे, असे शरद पवार म्हणाले.