महाराष्ट्र

maharashtra

अनलॉकमध्ये महिलांवर लैंगिक गुन्हे वाढले; नागरिकांची कोंडलेली विकृत मानसिकता जवाबदार?

By

Published : Dec 12, 2020, 11:33 AM IST

लॉकडाऊन दरम्यान नागरिकांमध्ये कोंडली गेलेली मानसिकता आता अनलॉकमध्ये समोर येत आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये मुंबईमध्ये गुन्ह्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे समोर आले. यामध्ये लैंगिक अत्याचारांची संख्या जास्त आहे.

Sexual Assault
लैंगिक अत्याचार

मुंबई -कोरोना विषाणूचे संक्रमण थांबवण्यासाठी राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. तीन ते चार महिने सर्वजण आपल्या घरातच बसून होते. आता अनलॉकच्या माध्यमातून नागरिकांना सूट देण्यात आली आहे. याचा परिणाम मुंबई घडणाऱ्या गुन्ह्यांवर सुद्धा पहायला मिळत आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये मुंबईमध्ये गुन्ह्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे समोर आले. यामध्ये लैंगिक अत्याचारांची संख्या जास्त आहे.

वाढलेल्या गुन्ह्यांना नागरिकांची कोंडलेली विकृत मानसिकता जवाबदार

विविध गुन्ह्यांमध्ये वाढ -

आर्थिक राजधानी मुंबईत ऑक्टोबर महिन्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडे, खंडणी, चोरी, लैंगिक अत्याचार, विनयभंग यासारख्या गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. मुंबई पोलिसांनी आकडेवारीचा एक अहवाल प्रकाशित केला आहे. त्यानुसार ऑक्टोबर महिन्यात मुंबई शहरातील 94 पोलीस ठाण्याच्या अंतर्गत केलेल्या कारवायांमध्ये 3 हजार 904 गुन्हे नोंदवण्यात आले. त्यातील 2 हजार 295 प्रकरणांचा पोलिसांनी छडा लावला आहे.

ऑक्टोबर महिन्यात घडलेले मोठे गुन्हे -

ऑक्टोबर 2020 या महिन्यात मुंबई शहरात एकूण 17 खुनाचे गुन्हे नोंदवण्यात आले तर, खुनाच्या प्रयत्नाचे 55 गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आले. दरोड्याच्या 2 घटना घडल्या तर लूटमारीचे 69 गुन्हे नोंदवण्यात आले. खंडणीचे 21 गुन्हे या महिन्यात दाखल झाले. घरफोडीचे 160 गुन्हे मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आले आहेत. चोरीचे 396 , वाहन चोरोचे 322, जखमी करण्याचे 464 गुन्हे मुंबई पोलिसांनी या काळात नोंदवले आहेत. मुंबई दंगलीचे ३५ गुन्हे घडले असून बलात्काराचे 80, विनयभंगाचे 229 तर इतर प्रकरणात 2 हजार 38 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे गुन्हे वाढले -

ऑक्टोबर महिन्यात मुंबईमध्ये मुलींवर अत्याचाराचे 80 गुन्हे घडले होते. त्यात 42 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता. अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे 95 गुन्हे नोंदवण्यात आले होते. जानेवारी 2020 ते आतापर्यँत मुंबई शहरात तब्बल 44 हजार 498 गुन्हे घडले असून यातील 35 हजार 143 गुन्ह्यांचा तपास लागला आहे. यात खुनाचे 124, खुनाच्या प्रयत्नाचे 283 , दरोड्याचे 14, खंडणीची 158 , वाहन चोरीचे 2 हजार 223, चोरीचे 2 हजार 676, लैंगिक अत्याचाराचे 616 गुन्हे (अल्पवयीन 360, महिला 256) दाखल झाले आहेत. विनयभंगाचे 1 हजार 230 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वाढत्या गुन्ह्यांना नागरिकांची कोंडलेली मानसिकता जवाबदार -

लॉकडाऊन दरम्यान नागरिकांमध्ये कोंडली गेलेली मानसिकता आता अनलॉकमध्ये समोर येत असल्याचे मुंबई पोलीस खात्यातील माजी ज्येष्ठ पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांनी म्हटले आहे. लोकांच्या कोंडलेल्या मानसिकतेचे रूपांतर हे विकृतीमध्ये झाले आहे. यामुळेच महिलांवरील लैंगिक अत्याचार, विनयभंग व अपहरणासारखे गुन्हे वाढले आहेत. आकडेवारीवरून हे सिद्धही होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details