मुंबई- गेल्या कित्येक वर्षापासून ज्येष्ठ नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या समस्यांकडे प्रशासनाकडून पुरेसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे या पावसाळी अधिवेशनात ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या नाही, तर मोठे जनआंदोलन या अधिवेशनाच्या काळात करणार असल्याची माहिती महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघातर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली. तसेच शेवटचा पर्याय म्हणून आत्मदहन करण्याचा इशाराही यावेळी सरकारला देण्यात आला आहे.
यापूर्वीदेखील शासनाकडे ज्येष्ठ नागरिकांनी प्रलंबित मागण्यांबाबत राज्यभर जिल्हा, तालुकास्तरावर शांततापूर्ण मूकमोर्चे आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, शासनाने त्यांची दखल घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच मागील अधिवेशनात दिलेल्या आश्वासनाची पूर्ततादेखील केलेली नाही. त्यामुळे या पावसाळी अधिवेशनात सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे, अन्यथा आत्मदहन करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले.