मुंबई -जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूचा फटका आता बॉलीवूडला बसण्यास सुरुवात झाली आहे. लंडनहुन मुंबईत परतलेले सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक अनुप जलोटा यांना हॉटेल मिराजमध्ये पालिकेच्या आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली 'होम क्वॉरंटाईन' मध्ये ठेवण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन जलोटा यांनी केले आहे.
हेही वाचा -गर्दी टाळा.. अतिमहत्वाचे काम असेल तरच घरातून बाहेर पडा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आवाहन
जगभरात कोरोनाने दहशत माजवली आहे. कोरोनामुळे जगभरात हजारो लोकांचा बळी या विषाणूमुळे घेतला आहे. मुंबईतही या विषाणूचे 15 रुग्ण सापडले असून कोरोनाची लागण झालेल्या एका 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने देशाबाहेरून आलेल्या नागरिकांना आणि प्रवाशांना विमानतळावर तपासणी करून सेव्हन हील हॉस्पिटल किंवा विमानतळाजवळच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये बनवण्यात आलेल्या 'होम क्वॉरंटाईन' सेंटरमध्ये ठेवले जात आहे. ज्या प्रवासी आणि पर्यटकांना चांगल्या ठिकाणी पैसे मोजून राहायचे आहे त्यांच्यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.
हेही वाचा -Coronavirus : 'कोरोना'चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मेट्रो स्थानक आणि गाड्यांची साफसफाई सुरू
अशाच एका हॉटेल मिराज या पंचतारांकित हॉटेलमध्ये सुप्रसिद्ध भजन आणि कीर्तन गायक अनुप जलोटा यांना 'होम क्वॉरंन्टाईन' मध्ये ठेवण्यात आले आहे. जलोटा हे लंडन येथे एका कार्यक्रमाला गेले होते. लंडन येथून मुंबईला परत आल्यावर त्यांना मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने तपासले आणि पुढील 14 दिवस होम क्वॉरंन्टाईनमध्ये राहण्याचा सल्ला दिला. जलोटा यांनी हॉटेल मिराजमध्ये स्वतःला होम क्वॉरंटाईन करून घेतले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन जलोटा यांनी केले आहे.