मुंबई :ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर यांचे निधन झाले. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती खालावल्याने शिरीष कणेकर यांना आज सकाळी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
साहित्य क्षेत्रात पोकळी :शिरीष कणेकर यांचे चित्रपट, क्रिकेट, राजकारण या विषयावर वर्तमानपत्रातील स्तंभ अतिशय लोकप्रिय आहेत. 'कणेकरी', 'फिल्लमबाजी', 'शिरीशासन' हे त्यांचे विनोदी आणि उपरोधाच्या अंगाने केलेले अप्रतिम लेखन आहे. शिरीष कणेकर यांच्या निधनानंतर पत्रकारिता, साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तसेच त्यांची सदाबहार वक्ते म्हणुन देखील ओळख होती. त्यांनी साहित्याच्या सर्वच क्षेत्रात तितक्याच समरसतेने मुशाफिरी केली.
चि. वि. जोशी सर्वोत्कृष्ट विनोदी पुरस्कार :शिरीष कणेकर यांनी मुंबई विद्यापीठातून एलएलबी पदवी प्राप्त केली आहे. पत्रकार म्हणून त्यांनी इंडियन एक्सप्रेस, फ्री प्रेस जर्नल यांसारख्या प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये काम केले आहे. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सामनासह इतर दैनिकांत त्यांचे स्तंभलेखन प्रसिद्ध होते. त्याचप्रमाणे मनोहर, लोकप्रभा, चित्रलेखा या साप्ताहिकांतील त्यांचे लेख लोकप्रिय झाले होते. त्यांच्या 'लगाव बत्ती' या कथासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा चि. वि. जोशी सर्वोत्कृष्ट विनोदी पुरस्कार मिळाला आहे.
कोण आहेत शिरीष कणेकर : शिरीष कणेकर यांचे मूळ गाव रायगड जिल्ह्यात आहे. पेण हे शिरीष कणेकर यांचे मूळ गाव. त्याचे वडील रेल्वेत डॉक्टर होते. त्यामुळे त्यांचे बालपण भायखळ्यातील शासकीय निवासस्थानी असलेल्या रेल्वे रुग्णालयात गेले. शिरीष कणेकर हे ज्येष्ठ मराठी लेखक, पत्रकार, कथाकार होते. त्यांनी क्रीडा, सिने-पत्रकारिता, राजकारण यावर विपुल लेखन केले आहे.
हेही वाचा :
- Jayant Sawarkar passsed away : ज्येष्ठ अभिनेता जयंत सावरकर यांचे निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
- Divya khosla kumars Mother Passed Away : दिव्या खोसला कुमारच्या आईचे निधन, फोटोसह शेअर केली दु:खद बातमी
- CoCo Lee passes away : निराशेच्या गर्तेत गायिका कोको लीने केली आत्महत्या, संगीत जगतात शोककळा