महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सेना-भाजपचे सरकार म्हणजे आंधळा चौकीदार; धनंजय मुंडेंची टीका - चौकीदार

राज्यातला शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. तो भीषण दुष्काळाशी सामना करत आहे. त्याला दिलासा दिला गेला नाही. राज्यातल्या बेरोजगारांचाही भ्रमनिरास केला असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

धनंजय मुंडेंची टीका

By

Published : Jun 20, 2019, 8:10 AM IST

Updated : Jun 20, 2019, 8:24 AM IST

मुंबई- राज्यपालांचे अभिभाषण पाहून राज्यात 'ऑल इज वेल' वाटेल परंतु राज्यात काहीच ऑल इज वेल नाही, तर नथिंग इज वेल आहे. राज्यातील सेना-भाजपचे सरकार म्हणजे आंधळा चौकीदार असल्याची जोरदार टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानपरिषदेत बोलताना धनंजय मुंडे यांनी सरकारच्या विविध योजनांची व त्या ज्यापद्धतीने राबवल्या जात आहेत त्याची चिरफाड केली.

समाजमाध्यमातून राज्यातले हे आंधळे सरकार ऑल इज वेल असल्याची ओरड करताना दिसत आहे. परंतु प्रत्यक्षात युवकांच्या रोजगाराची, मागासवर्गीय आरक्षण, शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावाची, शहरी जनतेच्या कराची, एफएसआयची, शिक्षणाच्या हक्काची, सर्वसामान्य जनतेच्या जमिनीची, पीकविमा कंपन्यांच्या भल्यासाठी शेतकऱ्यांच्या खिशातून चोरी केल्याचा गंभीर आरोप धनंजय मुंडे यांनी करत सरकारला धारेवर धरले. राज्यपालांच्या अभिभाषणात जुन्याच योजनांची आणि पूर्ण न झालेल्या घोषणांची लांबलचक यादी दिलेली आहे. त्यात महाराष्ट्राच्या पुढील वाटचालीचे कोणतेही दिशादर्शन झालेले नाही, असा थेट आरोपही धनंजय मुंडे यांनी केला.

राज्यातला शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. तो भीषण दुष्काळाशी सामना करत आहे. त्याला दिलासा दिला गेला नाही. राज्यातल्या बेरोजगारांचाही भ्रमनिरास केला असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

राज्यात आरक्षणांबाबत सावळागोंधळ सुरू आहे. आरक्षण देतो सांगून मराठा, धनगर, मुस्लीम समाजाला फसवले गेले आहे. हजारो शेतकरी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे आत्महत्या करत आहेत. विशेष म्हणजे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून माझ्या मृत्युस आपण जबाबदार आहात, असे लिहून शेतकरी आत्महत्या करत आहे. दररोज सरासरी ७ शेतकरी आत्महत्या करत असताना त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा साधा मोठेपणा सरकार दाखवू शकले नाही. विखे पाटील यांनी केलेल्या मुंबईच्या डीपीतील १ लाख कोटी रुपये घोटाळ्यात मुख्यमंत्री कार्यालयावर आरोप केले म्हणून त्यामुळेच यांच्यासोबत मंत्रिपदाची डील झाली आहे का ? मंत्रिमंडळातून वगळलेल्या आणि भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप असलेल्या माजी मंत्र्यांवर गुन्हे दाखल करा आणि मंत्रिमंडळातल्या डझनाहून अधिक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. त्यांची चौकशी कधी होणार आहे? त्या भ्रष्ट मंत्र्यांवर गुन्हे दाखल करणार आणि त्यांना मंत्रिमंडळातून कधी हाकलणार? असा सवालही धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना केला.

Last Updated : Jun 20, 2019, 8:24 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details