महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रब्बी हंगामासाठी ३ लाख क्विंटल बियाणे अनुदानावर वाटप करणार - कृषीमंत्री दादाजी भुसे

कृषी विद्यापीठांमार्फत नव्याने संशोधित केलेल्या सुधारीत व संकरीत वाणांच्या प्रसारासाठी कृषी विभागामार्फत रब्बी हंगामासाठी ३ लाख १४ हजार क्विंटल बियाणे अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे. गहू, हरभरा, मका, रब्बी ज्वारी, करडई, जवस या पिकांसाठी पीक प्रात्यक्षिके व अनुदानित दराने बियाणे पुरवठा यासाठी ३ लाख १३ हजार ५८६ क्विंटल बियाण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे कृषीमंत्री भुसे म्हणाले.

कृषीमंत्री दादाजी भुसे
कृषीमंत्री दादाजी भुसे

By

Published : Nov 3, 2020, 5:02 AM IST

मुंबई - कृषी विद्यापीठांमार्फत नव्याने संशोधित केलेल्या सुधारीत व संकरीत वाणांच्या प्रसारासाठी कृषी विभागामार्फत रब्बी हंगामासाठी ३ लाख १४ हजार क्विंटल बियाणे अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे. यासाठी ६२.७९ कोटींची तरतूद करण्यात आल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

राज्यात चालू वर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने रब्बी हंगामासाठी अत्यंत पोषक असे वातावरण आहे. विविध योजनेंतर्गत गहू, हरभरा, मका, रब्बी ज्वारी, करडई, जवस या पिकांसाठी पीक प्रात्यक्षिके व अनुदानित दराने बियाणे पुरवठा यासाठी ३ लाख १३ हजार ५८६ क्विंटल बियाण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे कृषीमंत्री भुसे म्हणाले.

सुधारीत तंत्रज्ञानावर पीक -

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाच्या माध्यमातून क्षेत्र विस्तार व उत्पादकतेमध्ये वाढ करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात शाश्वत वाढ करण्यासाठी 'क्लस्टर' पद्धतीने प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात येत आहे. सुधारीत तंत्रज्ञानावर आधारीत गहू १ हजार ८३० हेक्टर, हरभरा २६ हजार ८२१ हेक्टर, मका (संकरीत) २९३ हेक्टर, रब्बी ज्वारी २ हजार ४६० हेक्टर, करडई १ हजार ५१० हेक्टर, जवस १ हजार ५० हेक्टर, ऊस पिकामध्ये आंतरपीक हरभरा २ हजार ५०० हेक्टर असे एकूण ३६ हजार ४६४ हेक्टर क्षेत्रावर प्रात्यक्षिकाचे नियोजन करण्यात आले आहे.

अनुदानावर बियाणे -

रब्बी हंगामामध्ये नव्याने विकसित केलेल्या सुधारीत-संकरीत वाणांचा प्रसार करण्यासाठी अनुदानित दराने शेतकऱ्यांना बियाणे पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी महाबीज, राष्ट्रीय बीज निगम, कृभको या बियाणे पुरवठादार संस्थांमार्फत शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे वितरीत करण्यात येते. १० वर्षाच्या आतील वाणांच्या बियाण्यासाठी गहू २००० रुपये क्विंटल, हरभरा २५०० रुपये क्विंटल, मका (सं) ७५०० रुपये क्विंटल, रब्बी ज्वारी ३००० रुपये क्विंटल यानुसार अनुदान देय आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान तसेच बियाणे व लागवड साहित्य उपअभियान अंतर्गत ग्रामबिजोत्पादन या योजनेंतर्गत हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीस चालना मिळेल, असा विश्वास कृषीमंत्र्यांनी व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details