मुंबई :आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अवघ्या काही महिन्यांचा अवधी शिल्लक असताना जागा वाटपावरून महायुतीमध्ये मोठा संघर्ष पेटला आहे. भाजपाने राज्यात मिशन ४५ टार्गेट केलं असताना अजित पवार गट आणि शिंदे गटानेसुद्धा लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या परीने जागांची मागणी केल्याने लोकसभा निवडणुकीचा जागा वाटपाचा तिढा कायम आहे. (Lok Sabha Election 2024) जागा वाटपाचा तिढा हा दिल्लीत सोडवला जाईल असं भाजपाच्या वरिष्ठांकडून सांगण्यात आलं असलं तरी प्रमाणापेक्षा कमी जागा पदरात पडल्यास शिंदे गट त्याचबरोबर अजित पवार गट वेगळी भूमिका घेतील का? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात जरी महायुती असली तरीसुद्धा आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त खासदार कसे निवडून येतील याकडे प्रत्येक पक्षाचा कल असणार आहे.
नेमक्या कोण किती जागा लढवणार -शिवसेनेतून बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी भाजपा सोबत जात राज्यात सत्ता स्थापन केली. अशा परिस्थितीत राज्यात शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत नाही तोच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार गटाने एन्ट्री करून राज्यातील सत्तेत आपलीही भागीदारी नमूद केली. आता अशा परिस्थितीत २०२४ लोकसभा निवडणुका तोंडावर असताना जागा वाटपावरून तिन्ही पक्षांमध्ये मतभेद सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने 'मिशन ४५'चे टार्गेट आखले असून त्या दृष्टिकोनातून त्यांनी राज्यभर तयारी सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री तसंच भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे स्वतः फेब्रुवारी महिन्यापासून प्रत्येक लोकसभा मतदारसंघ पिंजून काढणार आहेत. यादरम्यान त्यांच्या जोडीला शिंदे गट तसंच अजित पवार गटाचे मोठे नेतेसुद्धा उपस्थित राहणार आहेत. किंबहुना काही मतदारसंघांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिन्ही नेते प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत. हे सर्व आतापर्यंत ठरलं असलं तरीसुद्धा नेमक्या कोण किती जागा लढवणार? यावरून मोठ्या प्रमाणामध्ये अंतर्गत पेच निर्माण झाला आहे.
भाजपासाठी फार मोठी डोकेदुखी :लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत राज्यातील एकूण ४८ जागांपैकी भाजपाने 23 जागांवर विजय मिळवला होता. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने १८ जागांवर विजय मिळवला होता. तसंच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ५ जागांवर विजय संपादित केला होता. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर आताच्या घडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत १२ खासदार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्यासोबत रायगडचे सुनील तटकरे हे एकमेव खासदार आहेत. अशा परिस्थितीमध्ये भाजपा किमान २५ जागांवर आपले उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. यामध्ये ३ ते ४ जागांची वाढही होऊ शकते. तर शिंदे गटाकडून लोकसभेसाठी १९ जागांची मागणी केली जात आहे. अशा परिस्थितीमध्ये अजित पवार यांच्या गटाला जेमतेम ४ ते ५ जागा मिळण्याची शक्यता आहे. यावरून अजित पवार गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रस्सीखेच सुरू आहे. यांच्यातील जागा वाटपाचा तिढा कशा पद्धतीनं सोडवता येईल, ही शिंदे किंवा पवार यांना नाही तर भाजपासाठी फार मोठी डोकेदुखी ठरली आहे.