मुंबई- मुंबईमध्ये मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. रुग्णसंख्या वाढत असतानाच मुंबईमधील शाळा सुरू केल्या जाणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत ठरल्याप्रमाणे येत्या 13 जूनपासून सर्व शाळा सुरू केल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत पालिका शाळा सुरु करण्यात येतील, अशी माहिती पालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली.
कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरू करणार -मार्च, 2020 मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि त्यानंतर शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कोरोनाची पहिली लाट थोपवण्यात यश आल्यानंतर शाळा सुरू करण्यात आल्या. मात्र, त्यानंतर कोरोनाची दुसरी व तिसरी लाट आल्याने शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या. सध्या शाळांना सुट्टी असून दरवर्षीप्रमाणे 13 जून रोजी मुंबईतील पालिका शाळा सुरू केल्या जातात. मात्र, कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शाळा सुरू होणार का यावर प्रश्नचिन्ह होते. याबाबत पालकांमध्ये भिती व संभ्रमावस्था आहे. मात्र, कोरोनाचा आढावा घेतल्यानंतर येत्या 13 जूनपासून शाळा नियमितपणे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, कोरोना नियम व खबरदारी घेऊन शाळा सुरू केल्या जाणार आहेत. महापालिका शाळांत येणाऱ्या विद्यार्थी, शिक्षकांसह अन्य कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत पालिकेच्या 500 शालेय इमारतींचे सॅनिटायझेशन पुढील 6 दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच शाळेच्या गेटवर थर्मल स्क्रिनिंग करण्यात येणार असून प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत मास्क देण्यात येणार असल्याचे कंकाळ यांनी सांगितले. शाळांमध्ये ऑक्सिमीटर, सॅनिटायझरची व्यवस्था, विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
योग्य ती काळजी घेतली जाणार -पालिकेच्या 1 हजार 147 शाळा असून तीन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एका वर्गात 40 ते 50 विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यामुळे शाळा सुरु झाल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे हे शिक्षण विभागासमोर मोठे चॅलेंज आहे. परंतु शिक्षण विभागाने याबाबतही योग्य ती दक्षता घेतली असून प्रत्येक वर्गात सोशल डिस्टन्सिंगचे नियम कशा प्रकारे पाळावेत याबाबत योग्य ती काळजी घेतली जाईल, असे ही ते म्हणाले.
पालिका शाळांतील सद्यस्थिती
विद्यार्थी संख्या- 2 लाख 98 हजार 498
एकूण शिक्षक- 10 हजार 420