मुंबई- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या आठ महिन्यांपासून शाळा बंद होत्या. मात्र, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आजपासून ९वी ते १२ पर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. यासाठी शाळा प्रशासनाने तयारी केली असून शिक्षकांच्या कोरोना चाचण्यादेखील करण्यात आल्या आहेत. काही जिल्ह्यांमध्ये दिवाळीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शाळा आज उघडणार नाहीत. तर, काही जिल्ह्यांमध्ये आजपासून शाळा सुरू होणार आहेत. अनेक शिक्षकांच्या कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्याने शाळांमध्ये देखील संभ्रमाचे वातावरण आहे.
या जिल्ह्यांमध्ये उघडणार शाळा -
लातूर, नंदुरबार, रायगड, गडचिरोली, वर्धा, अमरावती, औरंगाबाद ग्रामीण भागातील शाळा आजपासून उघडणार आहे. शाळा प्रशासनाने याबाबतची तयारी पूर्ण केली आहे.
या जिल्ह्यांमध्ये बंद असणार शाळा -
मुंबई, नागपूर, ठाणे, औरंगाबाद शहर, जळगाव, नाशिक, पुणे याठिकाणी शाळा उघडणार नाहीत. दिवाळीनंतर या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या जिल्ह्यांमध्ये डिसेंबर आणि जानेवारीत शाळा सुरू होतील. मात्र, अंतिम निर्णय हा त्यावेळी कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन घेतला जाईल.
लातुरातील ५४२ शाळांची घंटा वाजणार
जिल्ह्यातील माध्यमिक शाळा सुरू करण्याच्या अनुषंगाने प्रशासनाकडून सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यात ६४७ शाळा असल्या तरी सोमवारी ५४२ शाळा सुरू होणार आहेत. त्यानुसार प्रशासनाने घालून दिलेल्या नियम अटींचे पालन केले जात आहे. शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे यांनी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांचा आढावा घेतला आहे. याकरिता पालकांचे संमती पत्रही घेण्यात आले आहे.
राज्यात ५०० पेक्षा जास्त शिक्षक कोरोनाबाधित
शाळा उघडण्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या चाचण्यांमध्ये राज्यात तब्बल पाचशेहून अधिक शिक्षक कोरोनाग्रस्त असल्याचे पुढे आले आहे. मुंबईसह राज्यातील ५० हजाराहून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कोरोना चाचणीचे अहवाल अजूनही प्रलंबित असल्याने शाळा उघडण्याबाबत प्रश्नचिन्ह आहेत.
सरकारमध्ये समन्वयाचा अभाव
राज्यातील एकूणच परिस्थिती पाहून येत्या काळात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना केले. तर, दुसरीकडे अशीच भूमिका शिक्षण राज्यमंत्री बचू कडू यांनी जाहीर केली. कोरोनाची दुसरी लाट आली, तर शाळा सुरू करण्याचा फेरविचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची भूमिका कायम आडमुठी राहिल्याने याविषयी पालकांमध्ये शाळा सुरू करण्यासाठी चिंता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा -पाचशेहून अधिक शिक्षक कोरोनाग्रस्त; अनेक शिक्षकांचे अहवाल अद्यापही बाकी
हेही वाचा -जळगाव जिल्ह्यातील शाळा 7 डिसेंबरपर्यंत राहणार बंद; कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता प्रशासनाचा निर्णय