मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अजित पवार हे नाव चर्चेत आहे. मागील काही दिवस माजी उपमुख्यमंत्री व विद्यमान विरोधीपक्ष नेते अजित पवार हे भाजपला पाठिंबा देणार अशा आशयाच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, अजित पवार यांनी मंगळवारी विधान भवनाबाहेरून पत्रकार परिषद घेऊन या सर्व शक्यता आणि चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी अजित पवार यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामानातील अग्रलेखावरून खासदार संजय राऊत यांना आपल्या पक्षांतर्गत विषयात दखल न देण्याचा सल्ला दिला. यावर आता खासदार संजय राऊत यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
त्यावेळी तुम्ही वकिली केली होती: अजित पवार यांच्या वक्तव्यावर आपले मत व्यक्त करताना खासदार संजय राऊत म्हणाले की, आम्ही महाविकास आघाडीतील घटक पक्ष आहोत. आपण माझ्यावर खापर का फोडता? महाविकास आघाडीचे वकीली केली म्हणून? मी महाविकास आघाडीचा चौकीदार आहे. आपण माझ्यावर खापर का फोडतात आणि फोडण्याचा कारण काय? जेव्हा शिवसेना फुटली तेव्हाही तुम्ही आमची वकिली करत होतात. हे आमच्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपल्या बरोबरचा घटक पक्ष मजबूत राहावा आणि त्याचे लचके तुटले जाऊ नये. ही जर आमची भूमिका असेल तर त्यासाठी कोणी आमच्यावर खापर फोडत असेल तर जरा गंमत आहे.
फडणवीस या दोघांचे राजीनामे घ्या: राज्यातील वादग्रस्त मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयात मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार महाराष्ट्र स्टेट ड्रगिस्ट असोसिएशनने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. यावर बोलताना खासदार राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षात असताना सातत्याने अशा विषयांवर राजीनामा मागत होते. खरेतर देवेंद्र फडणवीस यांनी दोघांचे राजीनामे मागायला पाहिजेत. त्यांच्यात माणुसकी, मानवता आणि आत्मा जिवंत असेल तर संजय राठोड यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे. खारघर येथे महाराष्ट्र भूषण देताना जो हलकल्लोळ झाला. जी अराजकता माजली, चेगराचेंगरी झाली जे ढिसाळ नियोजन झाल्यामुळे तप्त उन्हात चेंगराचेंगरी होऊन 14 लोक ठार झाले. त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे.