मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या निर्णयाने महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणात खळबळ माजली आहे. शरद पवार यांच्या या निर्णयावर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांनी पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगून त्यांनी राजकारणातून संन्यास घेतलेला नाही, असे म्हटले आहे. तसेच शरद पवारांचा निर्णय हा कुठलीही राजकीय खेळी नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. राऊत मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
'पदावरून निवृत्त, राजकारणातून नाही' : यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतलेला असून ते राजकारणातून निवृत्त होणार नाहीत. शरद पवार हे समाजकारणातून कधीच निवृत्त होणार नाहीत. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ज्या काही अंतर्गत घडामोडी सुरू आहेत, त्या अनुषंगाने हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. मी या विषयावर बोलणे उचित होणार नाही. शरद पवार यांच्या नेतृत्वाची फक्त राज्यालाच नाही तर देशालाही गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या पक्षात त्यांच्या या निर्णयासंदर्भात चर्चा सुरू आहे. यावरही लवकरच निर्णय घेतला जाईल. काही घडामोडी अचानक घडल्या असल्या तरी त्यात अनपेक्षित असे काही नाही, असं मला अलीकडच्या काही निर्णयावरून वाटतं, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.