मुंबई- भाजपनं २४ तासात जाऊन सत्तास्थापनेचा दावा करायला हवा होता. मात्र, भाजपने उशीर केला आहे. राज्यपालांनी त्यांना सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केले आहे. त्यांनी लवकरात लवकर सत्ता स्थापन करावी, तसेच जर भाजप महाराष्ट्राच्या हितासाठी सरकार स्थापन करत असेल, तर उद्धव ठाकरेंच्या त्यांना शुभेच्छा आहेत. असेही शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. ते आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
राऊत म्हणाले, सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी राज्यपालांनी घेतलेल्या भूमिकेचं स्वागत, राज्यातील अस्थिरता संपावी हीच आमची भूमिका आहे. भाजपनं राज्यात सत्ता स्थापनेच्या संधीचा लाभ घ्यायला हवा. तसेच त्यांनी बहुमतही सिद्ध करावे असेही राऊत म्हणाले. तसेच शिवसेनेचे आमदार फोडण्याची हिंमत भाजपमध्ये नसल्याचाही टोला राऊत यांनी यावेळी भाजपला लगावला.
राज्यात अस्थिरता झाली आहे, भाजपने निकालानंतर 24 तासात सत्ता स्थापनेचा दावा केला पाहिजे होता. आता राज्यपालांनी त्यांना सत्ता स्थापनचे आमंत्रण दिले आहे. त्यांच्या भूमिकेचे शिवसेना स्वागत करते. तसेच भाजपला सरकार बनवण्याची संधी देण्यात आली आहे. त्यांनी लवकरच सत्ता स्थापन करावी, आमच्या त्यांना शुभेच्छा असल्याचेही राऊत यावेळी म्हणाले. भाजपकडे बहुमत नाही असं मला वाटत नाही, मात्र राज्यपालांनी जी प्रक्रिया सुरू केली आहे ती पूर्ण होऊ द्या, असेही संजय राऊत म्हणाले.
आमचे नेते राजकीय व्यापारी नाहीत. त्यांनी कुठलीही डील केली नाही आणि कोणी फुटणारही नाहीत. तसेच आज उद्धव ठाकरे शिवेसेना आमदारांची भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन करतील असेही राऊत म्हणाले. तसेच कोणालाही विकत घेता येईल, अशी आता परिस्थिती नाही. भाजपच्या भ्रमाचा भोपळा आता फुटला आहे आणि सेनेचे आमदार विकत घेण्याची हिंमत कोणात नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.