मुंबई Sanjay Raut On Pm Modi : 'इंडिया' स्थापन होण्यापूर्वी भाजपाला एनडीएची आठवण कधीच झाली नाही. तेव्हा 'मोदी अकेला ही काफी है' असं भाजपावाले नेते म्हणत होते. मात्र इंडिया आघाडी स्थापन झाल्यानंतर भाजपाला एनडीएची आठवण झाल्याचा हल्लाबोल उबाठा गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी केला. आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपा पक्ष फुटलेला असेल, असं भाकितही संजय राऊत यांनी वर्तवलं आहे. संजय राऊत हे त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी मंगळवारी सकाळी माध्यमांशी बोलत होते.
बेकायदेशीर सरकार चालवायला समर्थन :संजय राऊत म्हणाले की, आम्ही विधानसभा अध्यक्षांवर दबाव आणत आहोत, असा आमच्यावर आरोप होत आहे. परंतु हा दबाव आमचा नाही, तो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. विधानसभा अध्यक्षांनी घटनेचं रक्षण करण्याची शपथ घेतली होती. त्यांच्या कार्यकाळात गेल्या एक वर्षापासून या महाराष्ट्रात घटनेचा, कायद्याचा खून होताना दिसत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यावर त्यांना काही वाटत नसेल, तर विधिमंडळाच्या इतिहासाचं काळं पान त्यांच्या नावावर लिहिलं जाईल, असा टोलाही संजय राऊत यांनी राहुल नार्वेकरांना लगावला. बेकायदेशीर सरकार चालवायला आपण समर्थन देत आहात, हे कितपत योग्य आहे, याचं चिंतन तुम्ही केलं पाहिजे, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.
विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवरुन जनतेच्या मनात रोष :सध्या विधानसभा अध्यक्ष यांच्या भूमिकेवरुन जनतेच्या मनामध्ये रोष असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. या रोषाची किंमत जे या कटात सहभागी आहेत, त्या सर्वांना चुकवावी लागणार असल्याचंही संजय राऊत यावेळी म्हणाले. भारतीय जनता पक्षात थोडी जरी नीतिमत्ता शिल्लक असेल, तर ते 16 आमदारांचा राजीनामा ताबडतोब घेतील. उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला होता. तसंच 2024 पूर्वी भाजपा व सुधीर मुनगंटीवार यांचं अकल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, हा माझा शब्द आहे, असंही राऊत म्हणाले. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सध्याची एनडीए ही एक नौटंकी आहे. 'इंडिया' निर्माण झाल्यानंतर त्यांना एनडीएची आठवण झाली. तोपर्यंत त्यांना एनडीएची आठवण झाली नव्हती. त्यानंतर त्यांनी सर्व बाजूनं लोक जमा करुन एनडीए म्हणून दिल्लीत बैठक घेतली. आम्ही 'इंडिया'ची स्थापना केल्यावर यांना एनडीएची आठवण झाली असून त्या अगोदर 'पंतप्रधान मोदी एकटे पुरेसे' आहेत, असं त्यांना वाटत होतं. परंतु 'इंडिया'च्या स्थापनेनंतर आपली ताकद वाढवावी लागेल, हे त्यांना समजून चुकलं, असंही संजय राऊत म्हणाले.