मुंबई : मणिपूरमध्ये ३ मेपासून सुरू असलेला हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही. या पार्श्वभूमीवर सर्व विरोधी पक्षांचे एक शिष्ट मंडळ मणिपूरला पोहोचले आहे. या शिष्टमंडळाने मणिपूरमधील जनतेशी संवाद साधला. यावरून विरोधी पक्ष नेत्यांच्या या शिष्टमंडळावर टीका केली जात आहे. दुसरीकडे शनिवारी ठाण्यात ठाकरे गटाचा हिंदी भाषिक मेळावा पार पडला. या मेळाव्यावरून भाजपने उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. याला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
मणिपूर हिंसाचाराबाबत मुंबईत आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, मणिपूरमध्ये दोनशेहून अधिक नागरिकांची हत्या करण्यात आली आहे. मंत्री व आमदार अशा काही लोकप्रतिनिधींची घरे जाळण्यात आली आहेत. महिलांच्या नग्न परेड काढण्यात आल्या आहेत. मात्र, आतापर्यंत पंतप्रधान तिकडे गेले नाहीत. तसेच त्यांनी संसदेत कोणतेही भाष्य केले नाही. आम्ही अनेक दिवसांपासून सांगत आहोत. मणिपूर देखील आपल्या देशाच्या एक भाग आहे. तेथील लोक आपल्या देशाचे नागरिक आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेणे हे सरकारचे व पंतप्रधानांचे कर्तव्य आहे. जर पंतप्रधानांना व सरकारला तिकडे जाण्यासाठी वेळ नसेल तर विरोधी पक्ष म्हणून मणिपूरच्या लोकांची भेट घेणे हे आमचे कर्तव्य आहे.
देशभरात आदिवासी समाजाचे मोर्चे निघाले-पुढे बोलताना राऊत म्हणाले की, देशातील सर्व विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ मणिपूरला गेले. यात भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष वगळता इतर सर्व पक्षांचे नेते या शिष्टमंडळात सोबत होते. त्यामुळे यावर राजकारण करण्यासारखे काय आहे? आमचे शिष्टमंडळ शनिवारी मणिपूरला गेल आहे. या शिष्टमंडळाने लोकांशी चर्चा केली. जर आपल्या देशातील लोकांशी बोलून चर्चा करणे, त्यांचे दुःख समजून घेणे, दुःख कमी करणे याला जर पंतप्रधान शो ऑफ म्हणत आहेत. यावरून आपल्या देशातील राजकारण किती खालच्या थराला गेले आहे, याचा विचार करा. संपूर्ण देशात या सरकारवर आता नाराजीचे वातावरण आहे. देशभरात आदिवासी समाजाचे मोर्चे निघाले आहेत. महाराष्ट्रदेखील तीन ठिकाणी आदिवासी समाजाचे मोर्चे झाले. त्यामुळे मणिपूरबाबत इतक्या खालच्या थराला जाऊन भाजपाचे लोक टीका करत आहेत. हा संपूर्ण आदिवासी समाजाचा अपमान आहे.