मुंबई Sanjay Raut On Eknath Shinde :माजी महापौर आणि ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवी यांना आज सकाळी अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळं दत्ता दळवी यांना अटक करण्यात आलीय. दत्ता दळवी यांच्या अटकेनंतर वातावरण तापलं असून, ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भांडूप पोलीस स्टेशन (Bhandup Police Station) इथं जाऊन कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. यावेळी राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिंदे गट आणि भाजपावर सडकून टीका केली.
मग त्यांना अटक का नाही? :माजी महापौर दत्ता दळवींना (Datta Dalvi) पोलिसांनी घरात घुसून अटक केली. मोठा गुन्हा असतो, तशा पद्धतीनं दळवींना अटक केली आहे. दळवी यांचा गुन्हा काय आहे, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. दळवींनी लोकांच्या भावना बोलून दाखवल्या. मुख्यमंत्र्यांसोबत गेलेल्या गद्दारांना आणि मुख्यमंत्री स्वत:ला हिंदू हृदयसम्राट म्हणून घेतात, याबद्दल दळवींनी बोललं तर काय चुकलं. मुख्यमंत्र्यांनी स्वत:ला हिंदू हृदयसम्राट म्हणून घेणं हा सावरकरांचा आणि बाळासाहेबांचा अपमान आहे. गुन्हा दाखल तर एकनाथ शिंदेंवर झाला पाहिजे, कारण त्यांनी स्वत:ला हिंदू हृदयसम्राट म्हणून घेतलं आहे, असं संजय राऊत म्हणाले.
हा शब्द चित्रपटात देखील दाखवला आहे : पुढं बोलताना राऊत म्हणाले की, जो शब्द दळवींना वापरला आहे, (भो...) हा शब्द धर्मवीर सिनेमात दिघे साहेबांनी बोलला आहे. गद्दार स्वत:ला हिंदू हृदयसम्राट म्हणून घेतात, याबद्दल बोललं तरी अटक कशी काय? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. जे सत्तेतील आणि भाजपातील लोक वादग्रस्त बोलतात, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही किंवा त्यांना अटक का नाही, मग आमच्यावर ही कारवाई का? असं देखील राऊत म्हणाले.