मुंबई Sanjay Raut On Eknath Shinde :बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आरक्षणावरुन मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये खडाजंगी झाल्याचा दावा उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. सध्या मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाद लावून हा महाराष्ट्र जातीपातीत तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. या महाराष्ट्रामध्ये कमजोर अस्थिर सरकार बसलं आहे. मुख्यमंत्र्यांना कोणी जुमानत नसून कॅबिनेटमध्ये सध्या गँगवॉरसारखी परिस्थिती निर्माण झाल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. एखाद्या मंत्र्याच्या अंगावर दुसरा मंत्री धावून जात आहे. ही परिस्थिती याआधी निर्माण झाली नव्हती, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.
महाराष्ट्र जातीपातीमध्ये तोडण्याचा प्रयत्न :"राज्यात सध्या घमासान सुरू आहे. मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाद लावून महाराष्ट्र जातीपातीमध्ये तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. या महाराष्ट्रामध्ये कमजोर आणि अस्थिर सरकार बसलं आहे. मुख्यमंत्र्यांना कोणी जुमानत नाही आणि भाजप यांना जुमानत नाही. राज्याच्या कॅबिनेटमध्ये सध्या गँगवॉर सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. एखाद्या मंत्र्याच्या अंगावर दुसरा मंत्री धावून जाण्याची परिस्थिती सुरू आहे. ही परिस्थिती याआधी निर्माण झाली नव्हती", अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
शंभूराज देसाई आणि छगन भुजबळ या दोन मंत्र्यांमध्ये वाद :मराठा आरक्षणाचा मुद्दा जोर धरत आहे. यात सध्या दोन पडले गट आहेत. एक मराठा आरक्षणाची मागणी करणारा आणि दुसरा गट विरोधात आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील सध्या आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. रोज सकाळी पत्रकार परिषद घेवून जारांगे पाटील सरकारला अल्टिमेटम देत आहेत. त्यातच आता मंत्री छगन भुजबळ यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या मंचावरून 17 नोव्हेंबरला जालना जिल्ह्यातील अंबड इथं होणाऱ्या मेळाव्यासाठी ओबीसी समाजातील 50 हजारपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र आणणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शंभूराज देसाई आणि छगन भुजबळ या दोन मंत्र्यांमध्ये वाद झाल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांना प्रमुख म्हणून बसण्याचा अधिकार नाही :"मुख्यमंत्री जर आपल्या मंत्र्यांवर नियंत्रण मिळू शकत नाहीत, तर मंत्र्यांचा प्रमुख म्हणून बसण्याचा त्यांना अधिकार नाही. मनोज जरांगे पाटील यांनी 24 डिसेंबर ही डेडलाईन दिली आहे. 24 डिसेंबर नंतर या महाराष्ट्रात काय होईल, हे कोणी सांगू शकत नाही. जरांगे पाटील यांनी मुंबईचं नाक बंद करण्याचा इशारा दिला आहे. जर मुख्यमंत्र्यांनी गांभीर्यानं घेतलं नाही तर या देशात महाराष्ट्राची बेअब्रू होईल. छगन भुजबळ मंत्री आहेत. ते ओबीसी समाजाला नेहमी मार्गदर्शन करत असतात. त्यांच्याकडं जर माहिती असेल, तर त्यांनी ती पोलिसांना द्यावी. मुख्यमंत्र्यांकडं द्यावी. जनतेच्या समोर ठेवावी. हवेत गोळीबार करून काय होते?" अशी टीका खासदार राऊत यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस कुणाचा यावर होणार आज सुनावणी :आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा ? यावर निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोनही गट समोरासमोर येणार आहेत. यावर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "इलेक्शन कमिशनर हे ईडी ( ED ) आणि सीबीआय प्रमाणं भारतीय जनता पार्टीचा पिंजऱ्यातला पोपट आहेत. ज्या पद्धतीनं शिवसेनेच्या बाबतीत महाराष्ट्रात इलेक्शन कमिशननं निर्णय घेतला, हा पूर्णपणे सरकारच्या दबावाखाली घेतला. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना वीस पंचवीस आमदार इकडं तिकडं गेले म्हणून संपूर्ण शिवसेना एका फुटीर गटाच्या हातात ठेवावी, त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशनची नियत आणि बिघडलेल्या चरित्र दिसते. अशा कमिशनकडं जाऊन काय न्याय मिळणार आहे ? शरद पवार हयात आहेत. पक्षाचे संस्थापक आणि त्यांचा पक्ष अजित पवार यांना दिला जातो, असं इलेक्शन कमिशन आपल्याला लाभलं आहे", अशी टीकाही खासदार संजय राऊत यांनी यावेळी केली.
हेही वाचा :
- Sanjay Raut on PM Modi Shirdi visit: पंतप्रधानांच्या शिर्डी दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका, म्हणाले...
- Eknath Shinde On Sanjay Raut : विरोधकांकडे आरोप करायचंच काम उरलंय; मुख्यमंत्र्यांचा संजय राऊतांना टोला