मुंबई - निकालाची वाट बघणं यापेक्षा आमच्या हातात काय, कोणतीही गोष्ट महाराष्ट्रात सुडापोटी केली जात नाही. एका नटीच्या बेकायदा बांधकामासाठी छाती बडवणाऱ्यांनी आणि नटीने हाथरसवर बोलावं, बलरामपूरवर बोलावं. या नटीसह तिच्या सर्व समर्थकांना आता हाथरसला जाण्याचं तिकीट काढून द्यावं लागणार, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना रणौैतचे आणि भाजपवर थेट नाव न घेता केली आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांची प्रतिक्रिया एका नटीचं बेकायदा बांधकाम वाचवण्यासाठी काही लोकांनी छाती बडवली. हाथरस आणि बलरामपूर घटनेवर हे लोक का बोलत नाहीत. त्या नटीनंही या घटनेवर बोललं पाहिजे. या घटनेबद्दल तिचं मत काय आहे, हे देशाला कळू देत. त्यांना हाथरसचा रस्ता माहीत नसेल तर आम्ही सांगू. हाथरसला कसं जायचं आणि कुठे थांबायचं, याची सविस्तर छापिल माहिती आणि हाथरसला जाण्याचं तिकिट या लोकांना देण्यास आमच्या लोकांना सांगणार आहे, असे राऊत यांनी म्हटले.
सुशांत प्रकरणाचा तपास पोलीस चांगला करत होते. त्याच्या आत्महत्येचे कारणही पोलिसांना माहीत होते. शवविच्छेदन अहवालात सर्व नमूद होते. पण मृत्यूनंतर कुणाचे चारित्र्यहनन नको म्हणून पोलीस काही बोलत नव्हते. आम्हीही मृत्यूनंतर कुणाची बदनामी नको म्हणून बोललो नाही. मात्र, सीबीआयकडे तपास गेल्यानंतर ड्रग्स आणि चरस सर्व काही बाहेर आले. आता तर एम्सच्या डॉक्टरांनीही सुशांतने आत्महत्या केल्याचा अहवाल दिला आहे. एम्सचे डॉक्टर हे काही शिवसैनिक नाहीत. मुंबई पोलिसांची बदनामी करण्यात आली, कोणीही मेल्यानंतर बदनामी करत नाही ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. मात्र, महाराष्ट्र सरकारची बदनामी करणाऱ्यांच हे षडयंत्र उधळले गेले. आमच्यासाठी खड्डा खोदणारे स्वत: खड्ड्यात पडले, असा टोलाही त्यांनी लगावला.
काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना धक्काबुक्की झाली नाही म्हणणाऱ्यांनी, देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांचे नातू जयंत सिंह यांच्यावरही उत्तर प्रदेश पोलिसांनी हल्ला केलाय हे विसरू नये असेही राऊत यांनी म्हटले. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावर झालेली कारवाई हिच ठोस करावाई आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बाकी कारवाई करत नाहीत, अशी टीकाही त्यांनी योगी सरकारवर केली.
हेही वाचा -कंगना रणौतच्या याचिकेचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने ठेवला राखून