मुंबई Sanjay Raut On EVM :आज (4 डिसेंबर) प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा उचलून धरला. तसंच यावेळी इंडिया आघाडीसंदर्भात बोलताना, चार राज्यांच्या निवडणूक निकालानंतर इंडिया आघाडीतील काही पक्षांमध्ये मतभेद आहेत. मात्र पुढे जायचं असेल तर सर्वांना सोबत घेऊन जाणं गरजंचं आहे. तरच आपण भाजपाला टक्कर देऊ, असं राऊत म्हणाले.
आम्ही लोकशाही मानणारे : चार राज्यातील निकाल समोर आले, आम्ही लोकशाही मानणारे आहोत. ईव्हीएमच्या माध्यमातून कालचा निकाल आला तो आम्ही स्वीकारतो. कालच्या निर्णयानं लोकं शॉक आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आज मिझोरमचे निकाल येतील. पण इथं भाजपा जिंकणार नाही. आम्ही जिंकणाऱ्यांचं अभिनंदन करतो. तेलंगाणासाठी राहुल गांधी यांचंही अभिनंदन. इंडिया आघाडी मजबूत असून 6 डिसेंबरला दिल्लीत बैठक होणार आहे. ज्यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील सहभागी होतील.
हिंमत असेल तर पालिकेच्या निवडणुका घ्या : मोदी आहेत तर बीजेपी आहे. जवाहरलाल नेहरु, महात्मा गांधी, यांच्यासोबत मोदी यांची तुलना होऊ शकत नाही. निकाल अपेक्षित नसले तरी तांडव न करता जनमत स्वीकारावं लागेल. दिग्विजय सिंग यांनी ईव्हीएमबद्दल इंडिया आघाडीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत संशय व्यक्त केला होता. लोकांच्या मनात अशी शंका असेल तर निवडणूक आयोगानं याची दखल घ्यावी. आम्ही पुन्हा सांगतो एक निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा. देवेंद्र फडणवीस म्हणाले विरोधक ईव्हीएमला दोष देतील, पण तुमच्या मनात हे का येतंय? तुमच्यात हिंमत असेल तर या निकालानंतर मुंबईसह पालिकेची निवडणूक घ्या, असं आव्हान राऊतांनी सत्ताधाऱ्यांना दिलं.
महाराष्ट्रात फक्त ठाकरे-पवारांचं मॅजिक चालणार :पुढं बोलताना ते म्हणाले की, पनौती या टीकेचा काही फटका बसला नाही. या जगात अनेकजण हरलेत, कोणीही माजू नये. या निकालानंतर कोणाचा माज वाढला हा त्यांचा प्रश्न आहे. भाजपा हा 'गरज सरो वैद्य मरो' असा पक्ष आहे. आम्ही हे भोगलंय. पण आम्ही लढू आम्ही जिंकू, महाराष्ट्रात फक्त ठाकरे आणि पवार आणि मविआचं मॅजिक चालणार. या देशात सगळं मॅनेज होतंय, ईव्हीएम पण झाल्या तर त्यात नवल काय? ऑपेरेशन लोटस भंकस आहे, असंही ते म्हणाले.
हेही वाचा -
- संजय राऊतांना जामीन; दादा भुसे म्हणाले 'दलाल माणूस'
- काँग्रेसचा विजय म्हणजे 'इंडिया'चा विजय; पाच राज्यांच्या निकालात दिसेल २०२४ च्या विजयाची झलक - संजय राऊत
- सत्तेतील लोकांनीही वादग्रस्त वक्तव्य केलीत, मग त्यांच्यावर कारवाई का नाही?, संजय राऊतांचा सवाल