मुंबई -पैशाचा कितीही खेळ करा, या सरकारच्या केसालाही धक्का लागणार नाही, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. सावरकर स्मारकात शिवसेनेचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.
संजय राऊत यांची प्रतिक्रिया २५ वर्षांचा करार करून पुन्हा सत्तेत येणार -
भाजपचे नाव न घेता त्यांनी यावेळी टीका केली. कोणी कितीही कारस्थाने केली, पैशाचा कितीही खेळ केला तरी जनता आमच्यासोबत आहे. ही पाच वर्षच नाही, तर पुढच्या २५ वर्षांचा करार आम्ही जनतेसोबत केला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत महाराष्ट्रातील सर्व जनता मुख्यमंत्री आहे, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्राचे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल
गेल्या एका वर्षात कोरोना, अतिवृष्टी अशा अनेक संकटांचा सामना करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कुठेही डगमगले नाही. तसेच गेल्या एका वर्षात अनेक आरोपही आमच्यावर झालेत, तरीही मुख्यमंत्री ज्या प्रकारे गाडा नेत आहे, ते अभिमानास्पद आहे, असेही संजय राऊत म्हणाले. कोणीही कितीही कारस्थान केले तरीही महाराष्ट्राचे सरकार पाच वर्ष पुर्ण करेल तसेच पुढच्या वेळी निवडूनही येईल, असा विश्वास संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला. विर सावरकरांचा विचार शिवसेना नेहमीच पाळत आली असून सावरकरांना भारत रत्न देण्याची मागणी यावेळी संजय राऊत यांनी केली.