मुंबई :नागपूरमध्ये सुरू असलेल्या राज्याच्या हिवाळी अधिवेशनात विरोधक शिंदे फडणवीस सरकारला धारेवर धरण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. राज्यात महापुरुषांचा अवमान, सीमावाद अशा अनेक प्रश्नांवरून विरोधक सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडत आहेत. सीमा भागातील गावांच्या प्रश्नांवरून विरोधक सभागृहाच्या पायऱ्यांवर रोज निदर्शनात करत आहेत. या सर्व संदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जहरी टीका केली.
तिकडे गुंगीचे औषध दिले काय?यावेळी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राचे क्रांतीकारक मुख्यमंत्र्यांचे काय म्हणणे आहे हे पाहीले पाहीजे. मध्यस्थी केली म्हणजे काय? जैसे थे म्हणजे काय? एक इंच जमिन देणार नाही. महाराष्ट्रातील हक्क सोडणार नाही अशी भाषा आजवर कोणी बोलले नाही. कर्नाटकाचे मुख्यमंत्री रोज उठतात कानफटीत मारतात. आपले मुख्यमंत्री गाल चोळत विधानभवनात जातात. तो जोर तो जोश आता दाखवा. देवेंद्र असतील किंवा मुख्यंमत्री असतील तुम्ही मुख्यमंत्री होण्यासाठी योग्य नाही. स्वताच्या मुद्यावर तुम्ही तासभर बोलतात. बाजूचा मुख्यमंत्री रोज बेअब्रू करतात. तुम्ही दोघे दिल्लीत गेलात तेंव्हा गुंगीचे औषध दिले काय. तिकडून आले आणि गप्प ते गप्पच आहेत.