मुंबई Sanjay Raut On BJP : आज (21 नोव्हेंबर) प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी 'काल मी एक ट्विट केलं, एक फोटो ट्विटच्या माध्यातून पोस्ट केला. यात मी कुणाचं किंवा कोणत्या पक्षाचं नाव घेतलं नाही. पण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, महाराष्ट्र पेटलेला आहे. महाराष्ट्र अस्वस्थ आहे. अशावेळी एका महाराष्ट्रातील जबाबदार व्यक्तीनं चीनच्या मकाऊ प्रदेशात जाऊन कॅसिनोत जाणे योग्य आहे का?' असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. तसंच फोटोप्रकरणी भाजपाची हिट विकेट गेलीय, असा टोलाही त्यांनी लगावलाय.
...मग तुम्ही खोटं का बोलता : पुढे बोलताना राऊत म्हणाले की, तिकडं जाणं म्हणजे गुन्हा नाही. पण तिथं गेल्यानंतर मी कुठे गेलो असं म्हणणं चुकीचं आहे. मकाऊ हे ठिकाण फक्त जुगारासाठी प्रसिद्ध आहे. कोणी पिझ्झा खायला तिथं जात नाही. पण फिरायला म्हणून गेलं पाहिजे. पण तिथे जाऊन खोटं बोलायचं याला काय म्हणावं? आपण जबाबदार लोक आहोत, परत तुम्ही पुन्हा येऊन आम्हालाच ज्ञान शिकवणार. त्या रात्री त्या फोटोतील व्यक्तीनं पोकर्स (पैसे) उडविले. साडेतीन कोटी रुपये उडवले. त्यामुळं भाजपाला अच्छे दिन आ गये, असं मला वाटतंय.
आधी ते चेक करा : तुम्ही कुटुंबासमवेत गेला होता, फोटोत कुटुंब दिसत नाही. मग तुम्ही एवढे मनाला का लावून घेताय. सरळ आणि स्पष्ट सांगा हो मी गेलो होतो. लोक अनेक ठिकाणी जातात, गोव्याला जातात मग काय झालं, पण खोटं का बोलायचं. आदित्य ठाकरेंच्या फोटोबद्दल राऊतांना विचारलं असता, तो ग्लास आहे की कोक आहे ते आधी चेक करा, असं राऊत म्हणाले. मोदींचे असे किती फोटो दाखवू, पंतप्रधान मोदी परदेशात जाऊन जी पितात, तोच ब्रॅंड आदित्य ठाकरे पितात, असं राऊत म्हणाले.