मुंबई Sanjay Raut On Eknath Shinde :बिग बॉस विजेता एल्विश यादव याच्या विरोधात नोएडा येथील सेक्टर 49 पोलीस स्टेशनमध्ये विषारी सापांची तस्करी आणि बेकायदेशीर रेव्ह पार्टी केल्याच्या आरोपाखाली एफआयर दाखल झालीय. याप्रकरणी त्याच्या पाच साथीदारांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यात असलेले 9 विषारी साप आणि विषही जप्त करण्यात आलंय. ताब्यात घेतलेल्या सापांमध्ये कोब्रा जातीचे पाच साप, एक अजगर, दोन दुतोंडी साप आणि एका रॅट स्नेकचाही समावेश आहे. या कारवाईमुळं आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झालीये. गणपतीच्या दिवसात हाच युट्यूबर यादव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी गणपतीच्या आरतीसाठी उपस्थित होता. त्यानं मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणपतीची आरती देखील केली. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्यानं चर्चांना उधाण आलंय.
संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर टीका :या प्रकरणावरुन आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला असून, मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईत आपल्या निवासस्थानी बोलताना राऊत म्हणाले की, या महाराष्ट्रात अमली पदार्थांचा व्यापार वाढलेला आहे. याचं उत्तर राज्याचे गृहमंत्री यांना द्यावं लागेल. रेव्ह पार्टीमध्ये सापाच्या विषापासून तयार होणारे अमली पदार्थ सेवन करणारे वर्षावर पोहोचतात आणि त्यांचं नाव तुम्हाला माहीत आहे. पण, मुख्यमंत्र्यांना माहित नाही?' असा सवाल त्यांनी केला.