मुंबई : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर खासदार संजय राऊत यांनी आज टीका केली. नड्डा जिथे जातात तिथे भाजपचा पराभव होतो, असे ते म्हणाले. नड्डा बुधवारपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यादरम्यान ते राज्यातील भाजप नेत्यांची भेट घेणार आहेत. पुढील वर्षी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपला दारूण पराभवाचा सामना करावा लागला, तर काँग्रेसने येथे मोठा विजय मिळवला आहे.
नितेश राणे यांचा पलटवार : नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले की, 'नड्डा आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी कर्नाटकात आले होते, पण तेथे त्यांचा पराभव झाला. आता ते महाराष्ट्रात आले आहेत. आम्ही त्याचे स्वागत करतो. ते जिथे जातात तिथे भाजपचा पराभव होतो.' दरम्यान, भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राऊत यांच्यावर पलटवार करत, नड्डा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यामुळे ते संपूर्ण देशाचे दौरे करतात. आम्ही त्याच्या नेतृत्वाखाली काम करतो. राऊत यांनी कर्नाटक निवडणुकीत स्वत: कोणाच्या उमेदवारांचा प्रचार केला, त्याच्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीला किती मते मिळाली हे त्यांनी सांगायला हवे, असे ते म्हणाले.