मुंबई :गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूर राज्यात हिंसा भडकलेली आहे. तिथे आमदार, त्या राज्याचे मंत्री सोबतच केंद्राचे विदेश राज्य मंत्री सिंग यांचेही घर जाळण्यात आले. या हिंसाचारामुळे या भागातून हजारो लोक निर्वासित झाले, हजारो लोकांनी या भागातून पलायन केले. हे गृहमंत्रालयाचे अपयश असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला. सीमेपलिकडून त्यांना शस्त्र पुरवण्यात येत आहेत, त्यामुळे तुमची चीनसोबत लढण्याची ताकद नाही, त्यामुळे तुम्ही मणिपूरमध्ये हस्तक्षेप करत नसल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला.
उग्रवाद्यांच्या गोळीबारात ९ जण ठार :मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू असून मंगळवारी उग्रवाद्यांनी केलेल्या गोळीबारात ९ जण ठार झाले तर १० जण जखमी झाले. यादरम्यान खमेनलोक गावातील अनेक घरांनाही उग्रवाद्यांनी आग लावली. तामेंगलाँग जिल्ह्यातील गोबाजंग येथेही अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. तर, दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ या एका कार्यक्रमाला गेल्या असता त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले आहे. सोबतच शिवसेनेचा वर्धापनदिन 19 तारखेला आहे. याची तयारी शिंदे गटानेही केली आहे. या सर्व मुद्द्यांवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेत जायची तयारी :इकडे आपले मणिपूर जळत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेत जायची आणि शक्ती प्रदर्शन करण्याची जोरात तयारी सुरू असल्याचेही ते म्हणाले. मणिपूर हिंसाचारात शेकडो लोक मारले जात आहेत. या भागात शंभरच्यावर उग्रवादी घुसले आहेत. त्याच्यावर एक शब्दही गृहमंत्री बोलायला तयार नाहीत. या राज्यात हिंदू मुसलमान झगडा करता येत नाही. कश्मीर प्रमाणे समाजात तेढ निर्माण करता येत नाही. म्हणून मणिपूरवर ते आता गप्प आहेत. काल 100 च्यावर उग्रवादी या भागात घुसले आहेत. इतकाच नाही तर त्यांना काही सीमेपलीकडून अत्याधुनिक शस्त्र पोचविण्यात आलेली आहेत. तुमची चीनशी लढण्याची ताकद नाही. म्हणून तुम्ही मणिपूरमध्ये हस्तक्षेप करत नाही. मणिपूरमधून घुसलेल्यांना चीनची मदत मिळत आहे. जसा पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राइक केला तसा चीनमध्ये सर्जिकल स्ट्राइक करण्याची हिम्मत आहे का?" असा थेट सवाल खासदार राऊत यांनी केला आहे.