मुंबई:'इंडिया' आघाडीची बैठक ३१ ऑगस्ट १ सप्टेंबर रोजी मुंबईत होत आहे. यासाठी महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू आहे. केंद्रातील मोदी सरकारला खाली खेचण्यासाठी सर्व विरोधक एकत्र आले आहेत. तरीसुद्धा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा विजय प्राप्त करण्यासाठी भाजपाकडून काहीही केलं जाऊ शकतं, असा संशय ठाकरे गटाचे खासदार, संजय राऊत यांनी व्यक्त केलाय. याचा दाखला देत राम मंदिराच्या उद्घाटनाप्रसंगी हल्ला केला जाण्याची भीती संजय राऊत यांनी व्यक्त केलीय. खासदार राऊत हे त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी बोलत होते.
२०२४ च्या लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी... संजय राऊत म्हणाले की, राम मंदिराच्या उद्घाटनासाठी देशातील कानाकोपऱ्यातून ट्रेन भरभरून लोक येणार आहेत. ज्या पद्धतीने पुलावामा घडलं, त्या पद्धतीने एखादा हल्ला या ट्रेनवर होऊ शकतो. दगडफेक होऊ शकते, आगीचे गोळे फेकले जाऊ शकतात, अशी भीती 'इंडिया' आघाडीच्या प्रमुख नेत्यांना आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी पुलवामा आणि गुजरात गोध्रा हत्याकांड झालं, तसं काहीही घडवून आणलं जाऊ शकतं, अशी शंकाही या नेत्यांना असल्याचं राऊत म्हणाले आहेत.
शिवसेनेला लोकसभेच्या कमीत कमी १९ जागा-'इंडिया' आघाडीच्या बैठकीत कुठल्याही पद्धतीने जागा वाटपाची चर्चा होणार नाही. या बैठकीत देशातील इतर ज्वलंत विषयांवर चर्चा होणार असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच २०१९ मध्ये आमचे १८ खासदार व दादरा नगर हवेलीमध्ये १ असे १९ खासदार होते. त्याच पद्धतीने यंदा तो आकडा १९ चा २० वर जाईल. परंतु त्यापेक्षा कमी होणार नाही. संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना लोकसभेच्या कमीत कमी १९ जागा लढवेल, असं सांगितलं आहे. या बैठकीबाबत ३० ऑगस्टला सायंकाळी ४ वाजता उद्धव ठाकरे, शरद पवार, अशोक चव्हाण, नाना पटोले हे सर्व प्रमुख नेता महत्त्वाची बैठक करणार आहेत. तेव्हा याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल, असंही राऊत म्हणाले आहेत.