मुंबई - काँग्रेसला लागलेल्या गळतीच्या कळातच ऐन निवडणूकीच्या तोंडावर पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी बंडाचा झेंडा फडकवल्याचे दिसत आहे. तिकीट वाटपात आपल्या समर्थकांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने संजय निरुपम यांनी ट्विट करून जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
'विधानसभा निवडणुकीसाठी मी फक्त एक नाव सुचवले होते आणि पक्षाने तेही नाकारले. हे अतिशय चुकीचे असून मी पक्षाच्या प्रचारातही सहभागी होणार नाही. पक्ष सोडण्याची माझ्यावर वेळ येणार नाही, अशी मला आशा आहे. मात्र पक्ष नेतृत्व ज्या पद्धतीने वागत आहे, त्यावरून हाही दिवस दूर नसल्याचे दिसून येत आहे', अशा आशयाचे एक ट्विट निरुपम यांनी केले आहे.