मुंबई - राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडीचे सरकार असताना सरकारकडून जारी करण्यात आलेल्या महाजॉब्सच्या जाहिरातीत काँग्रेसलाच वगळले आहे. या प्रकारावरून काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी काँग्रेसवरच निशाणा साधला आहे. या जाहिरातीत काँग्रेसचे नाव नसल्याने काँग्रेस शिवसेनेपुढे किती दिवस लोटांगण घालणार, त्यापेक्षा काँग्रेसने लढावे नाहीतर पक्ष संपून जाईल, असा सल्ला निरुपम यांनी एक ट्विट करून दिला आहे.
'सेनेपुढे लोटांगण घालण्यापेक्षा त्याविरोधात लढा, अन्यथा पक्ष संपेल' - संजय निरुपमांची काँग्रेसवर टीका
सरकारकडून जारी करण्यात आलेल्या महाजॉब्सच्या जाहिरातीत काँग्रेसलाच वगळले आहे. या प्रकारावरून काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी काँग्रेसवरच निशाणा साधला आहे.
राज्य सरकारने नुकतेच सुरू केलेल्या महाजॉब्सच्या पोर्टल आणि त्या संदर्भातील माहिती राज्यातील जनतेला मिळावी, म्हणून जाहिराती सुरू केल्या आहेत. या जाहिरातीमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेते झळकत असले तरी काँग्रेसच्या एकाही मंत्र्यांचा त्यात फोटो नसल्याने काँग्रेसकडून नाराजी व्यक्त केली जाते आहे. त्यातच काँग्रेस युवक प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे यांनीही एक ट्वीट करून याविषयीची नाराजी व्यक्त केली होती. त्याच पार्श्वभूमीवर संजय निरुपम यांनीही काँग्रेसवर निशाणा साधत काँग्रेस सरकारमध्ये आहे, अस ऐकलं आहे का? असा खोचक प्रश्न उपस्थित करून काँग्रेसच्या नेत्यांना डिवचले आहे. ज्या काँग्रेस नेत्यांना शिवसेनेबद्दल अगाध प्रेम झाले आहे, त्यांनी शिवसेनेच्या समोर लोटांगण घालण्यापेक्षा याविरोधात लढावे अन्यथा पक्ष संपून जाईल, असा इशारा निरुपम यांनी दिला आहे.
राजस्थानमध्ये सुरू असलेल्या सत्ता संघर्षाच्या संदर्भात निरुपम यांनी काँग्रेसवर टीका केली होती. आता त्यांच्या या नवीन ट्विटमुळे काँग्रेस नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जाण्याची शक्यता आहे.